अंधेरीत प्रेमसंबंधाला विरोध ठरला जीवघेणा; मुलीने प्रियकराच्या मदतीने केली वडिलांची हत्या

मुंबई, अंधेरी : प्रेमसंबंधाला कुटुंबाचा विरोध झाल्याने संतप्त मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी येथे घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहणारे शंकर कांबळे (वय ५८) हे त्यांच्या मोठ्या मुलीच्या अनैतिक संबंधांमुळे चिंतेत होते. मुलगी सोनाली बाईत (वय ३७) ही विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. मात्र पतीला सोडून २०२२ पासून ती महेश पांडे (वय २७) या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या नात्याला कुटुंबियांसह वडील शंकर कांबळे यांचा तीव्र विरोध होता.
८ जून रोजी महेश पांडे व शंकर कांबळे यांच्यात झालेल्या वादात पांडेने कांबळे यांना मारहाण केली होती. याची पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडून दिले होते, असे कांबळे यांचा मुलगा राहुल कांबळे याने सांगितले.
या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच, ११ जून रोजी संध्याकाळी अंधेरी कुर्ला रोडवरील महेश लंच होम समोर पुन्हा एकदा सोनाली व महेश यांनी मिळून शंकर कांबळे यांना मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी मुलगा राहुल पुढे आला, पण त्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शंकर कांबळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात सोनाली बाईत व महेश पांडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ११५ (२), व ३ (५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
"प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळेच ही घटना घडली असून आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला आहे," असे सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?






