हिंदी लादणुकीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एल्गार; ६ जुलै रोजी गिरगाव ते आझाद मैदान मोर्चा

मराठी शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाला विरोध

हिंदी लादणुकीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एल्गार; ६ जुलै रोजी गिरगाव ते आझाद मैदान मोर्चा

मुंबई, २६ जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घोषणा केली की ६ जुलै रोजी गिरगाव ते आझाद मैदान येथे हिंदी भाषा लादणुकीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांनी हा निर्णय मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून बंधनकारक करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात घेतला आहे.

राज ठाकरे म्हणाले, "मराठी भाषेवर ही एक प्रकारची योजनाबद्ध आगळीकीची कारवाई आहे. मराठीला नुकताच ‘शास्त्रीय भाषा’ दर्जा मिळालेला असताना, अशा प्रकारची हिंदीची लादणी मान्य नाही. ही मराठी भाषा नष्ट करण्याची षड्यंत्र आहे, आणि मनसे अशा लादणीला थांबवेल."

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, "या मोर्चाला कोणताही पक्षाचा झेंडा नसेल. हा मोर्चा सर्व मराठी भाषिक लोकांचा असेल. मी रविवारीचा दिवस निवडला आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकही सहभागी होऊ शकतील. साहित्यिक, कलाकार, राजकीय पक्ष, मराठीप्रेमी – सर्वांनी यात सहभागी व्हावे."

राज ठाकरे यांनी हिंदीच्या शिक्षकांच्या भरतीविषयीही प्रश्न उपस्थित केले. "सरकार म्हणतंय १०,००० शिक्षक भरती करू. पण त्यांच्या पगारासाठी निधी कुठून आणणार? राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत, मग भाषेवर एवढं का लक्ष?"

“हिंदी शिकून चित्रपटात काम मिळणार का? महाराष्ट्राची ओळख ही शिक्षणाच्या दर्जामुळे आहे, मग हिंदी लादून महाराष्ट्र महान होणार का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे म्हणाले, "सरकार जर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कला आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत असेल, तर आम्हाला हरकत नाही. मात्र हिंदी लादणे आम्हाला मान्य नाही."

मनसेने सरकारच्या या धोरणाला ठाम विरोध दर्शवला असून "हिंदी भाषा लादण्याच्या कोणत्याही प्रकारास आम्ही विरोध करत राहू," असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow