ठाण्यात दहीहंडी दरम्यान महिला अत्याचाराबाबत पथनाट्य व पोस्टरद्वारे केली जनजागृती

ठाणे:गोविंदा पथकांचा जल्लोष आणि बक्षिसांची लयलूट असा माहोल यंदा वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या "संस्कृतीची दहीहंडी २०२४" या महोत्सवात पाहायला मिळाला. यंदा ९ थर लावत आर्यन्स गोविंदा पथकाने ११ लाखाचे बक्षीस व ट्रॉफी पटकावली. या उत्सवास मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता मंगेश देसाई, अभिनेता क्षितिज दाते, शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तक नगर येथे संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या दहीहंडी उत्सवात पहिले ९ थर लावणाऱ्या गेविंदा पथकास ११ लाख रुपये व ट्रॉफी, पुढील ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख व आकर्षक ट्रॉफी, ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार व आकर्षक ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीसांची लयलूट करण्यात आली. तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष सन्मान देण्यात आला.
दहीहंडी उत्सव मुंबई, ठाणेपुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहचला. प्रो कब्बड्डी प्रमाणे प्रो गोविंदा सुद्धा झालेला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळात लक्ष घातले आणि या खेळाची व्यापकता वाढली आणि या खेळाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला, असे कौतुकोद्गार मा. मुख्यमंत्री महोदयांनी काढले. गोविंदा खेळाच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिली.
दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून एकतेचा विचार घेऊन समाजात ऐक्याचे बीज रोवूया असे आवाहन मा. देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रो गोविंदाने दहीहंडी सणाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. या माध्यमातून हा खेळ सर्वदूर पोहचत आहे,असे कौतुकही त्यांनी केले.
देशासह राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांवर अत्याचार करून त्यांची निघृण हत्या केली जाते. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करावे तसेच दोषींना फाशी देण्यात यावी असा संदेश देणारे पथनाट्य संस्कृती दहीहंडी महोत्सवात ओम साईनाथ नवभारत मंडळाने सादर केले.
महिलांवर अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी २०१९ च्या नागपूर अधिवेशनात शक्ती कायद्याचे विधेयक मांडले होते. या कायद्यात दोषींना फाशीची शिक्षा अंतर्भूत आहे. या शक्ती कायद्याला राष्ट्रपती महोदयांनी मंजूरी देऊन या कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. मुख्यमंत्री महोदयांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. या खेळाला प्रोत्साहन देत गोविंदांच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात, याबद्दल प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी दहीहंडी उत्सवावरील निर्बंध काढून या उत्सवाला प्रोत्साहन दिले. ७५ हजार गोविंदांचा विमा राज्य सरकारद्वारे उतरवण्यात आला. तसेच गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी त्यांनी जाहीर केली. दहीहंडी उत्सवाच्या पाठीशी मुख्यमंत्री महोदय भक्कमपणे पाठीशी उभे राहत आहे, याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आभार युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मानले. तसेच सर्वच गोविंदा पथकांनी उत्कृष्ट मानवी मनोरे या महोत्सवात सादर करून महोत्सवाची रंगत वाढवली याबद्दल सर्व गोविंदा पथकांचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले.
भर पावसात जय जवान गोविंदा पथकाने १० थर लावण्याचा प्रयत्न केला पण तो थोडक्यात हुकला. पण त्यांच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम. गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य अतिशय जल्लोषात व उत्साहात यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मुंबई टी २० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक तसेच संपूर्ण सरनाईक परिवारासह पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






