विरार-चिखलडोंगरीत नवीन सब-स्टेशनसाठी आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन; महापारेषणचे अभियंता ननावरे यांनी व्यक्त केले आभार

विरार:विरार-चिखलडोंगरी येथील सब-स्टेशनकरताचे भूसंपादन अनेक कारणांमुळे रखडले होते. मात्र तहसील कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत प्रत्यक्ष भेटी घेऊन, फोन करून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यातील अडचणी दूर केल्या. त्यांच्या या सहकार्यामुळेच या सब-स्टेशनच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सब-स्टेशनच्या निर्मितीत आमदारांचा सिंहाचा वाटा आहे. अमूल्य योगदान आहे,` अशी माहिती देत महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी आमदारांप्रति आदर व्यक्त केला.
विरार-चिखलडोंगरी येथील महावितरणच्या प्रस्तावित 222 केव्हीच्या सब-स्टेशनचे भूमिपूजन आज (18 सप्टेंबर) रोजी दुपारी लोकनेते तथा आमदार आमदार हितेंद्र ठाकूर आणि महावितरण व महापारेषणच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी या कामाविषयी उपस्थितांना माहिती दिली. तब्बल 167 कोटी रुपये खर्चाच्या या सब-स्टेशनचे काम येत्या 24 महिन्यांत मार्गी लागेल. या कामात काही अडथळा येणार नाही. कारण आमदार द्वयींनी हे काम आधीच सुकर करून दिलेले आहे. परंतु त्यानंतरही अडचण आलीच; तर आम्ही पुन्हा सहकार्यासाठी आपल्या दारात येऊ; पण दिलेल्या वेळेत काम पूर्ण करू, अशी ग्वाहीही अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी या वेळी दिली.
या विद्युत केंद्रातून पुढील दीड ते दोन वर्षांत वसई सर्कलला 100 मेगावॉट वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वसई-विरारची बहुतांश वीज समस्या निकाली निघेल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला. याशिवाय सोपारा वीज केंद्रात 100 मेगावॉट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. पुढील महिन्यात अजून 50 मेगावॉट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. तसेच वसई पूर्वेला कामण, सुरक्षा स्मार्ट सिटी व विरार-कोपरी येथे अजून तीन विद्युत केंद्रे (सब-स्टेशन) येत्या 2 ते 3 वर्षांत कार्यान्वित होतील, अशी माहितीही उपस्थित अधिकाऱ्यांकडून या वेळी देण्यात आली.
या भूमिपूजन सोहळ्याला माजी महापौर नारायण मानकर, माजी स्थायी समिती सभापती जितूभाई शहा, माजी सभापती अजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी नगराध्यक्ष कांता पाटील, माजी नगरसेवक रंजन पाटील, वामन पाटील, माजी सरपंच रामचंद्र मेहेर, गोवालिज इंडस्टियल असोसिएशनचे अशोक ग्रोव्हर, अशोक कुलास, किशोर शेट्टी, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता महेश भागवत, महापारेषणचे कार्यकारी अभियंता योगेश पोलपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिकारी-कंत्राटदारांसोबत बैठक घेणार!:आमदार हितेंद्र ठाकूर
गावकरी आणि सर्वांच्या सहकार्याने 167 कोटी खर्चाच्या 222 केव्ही सब-स्टेशनचे काम आज मार्गी लागले आहे, अशा शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. या सब-स्टेशनच्या जमीन संपादनात आमची भूमिका राहिली असली तरी आमच्यापेक्षा अधिकाऱ्यांनी या कामाचा पाठपुरावा करणे अधिक अपेक्षित होते. पण अधिकारी एकमेकांना नाचवण्यात आणि आपली पॉवर दाखवण्यात धन्यता मानतात. तेव्हा आम्हाला मध्ये पडावं लागतं, अशी खंत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केली. अशा लोकोपयोगी कामांत असे व्यत्यय येऊ नयेत, किंबहुना ही कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या सब-स्टेशनचे काम लवकर लवकर मार्गी लागावे, यासाठी येत्या चार दिवसांत या कामासंबंधी आपण पुन्हा एक बैठक घेऊ. या माध्यमातून संबंधित सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तांत्रिक अडचणी समजून घेऊ. आम्ही आपल्या सहकार्याकरता नेहमीच तत्पर आहोत, अशा शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना विश्वास दिला. केवळ उद्घाटन केले व नारळ फोडला असे होता कामा नये, असे सांगत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या कामासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य!:आमदार हितेंद्र ठाकूर
विरार-चिखलडोंगरी येथील सब-स्टेशनचे काम मार्गी लागण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. त्यांना या कामाची, त्याच्या निविदा प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती होती. त्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयांमुळेच हे काम मार्गी लागत आहे, अशा शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. याशिवाय त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपस्थित बहुजन विकास आघाडीचे सर्व सहकाऱ्यांचेही या कामात योगदान असल्याचे आमदार ठाकूर म्हणाले. भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते व अधिकाऱ्यांना माहिती असावी, यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सब-स्टेशन निर्मितीमागचे हे गुपित उघड केले.
What's Your Reaction?






