शिवसेना व बहुजन विकास आघाडीत ‘राजकीय` चर्चा!

मुंबई:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज (6 ऑक्टोबर) रोजी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. वसईतील प्रसिद्ध व्यावसायिक व स्वस्तिक डेव्हल्पर्सचे सहभागीदार किशोर नाईक यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त आयोजित शोकसभेला आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मात्र त्यानंतर त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वसईत या वेळी बहुजन विकास आघाडीसमोर महायुतीचे कडवे आव्हान असणार आहे. याशिवाय महाविकास आघाडीचाही बहुजन विकास आघाडीला सामना करावा लागणार आहे. साहजिकच; बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर पेच निर्माण झालेला आहे. या तीनही मतदारसंघांत या वेळी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी बहुजन विकास आघाडीला महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत ‘वाटाघाटी` कराव्या लागणार आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपला या तीनही मतदारसंघांतून मिळालेले 70 हजारांचे मताधिक्क्य लक्षात घेता महायुती बहुजन विकास आघाडीसोबत समझोता करेल, अशी सूतराम शक्यता नाही. त्यात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू अर्थात प्रथम महापौर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्या माध्यमातून महायुती बहुजन विकास आघाडीसमोर समर्थ पर्याय निर्माण करेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या शक्यतांना तोंड देत विजय प्रस्थापित करायचा तर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आता महाविकास आघाडीचा पर्याय आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे संबंध 2019 च्या निवडणुकीत बिघडले होते. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा थेट सामना शिवसेनेसोबत झालेला होता. मात्र आता या दोघांचाही शत्रू महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) व भाजप आहे. त्यांचा पराभव करायचा तर महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. याच रणनीतीचा भाग म्हणून विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या तीनही जागांवर बहुजन विकास आघाडीने अथवा महाविकास आघाडीने विशेषत: शिवसेनेने एकमेकांना पाठिंबा दिल्यास महायुतीचा पराभव करणे सोपे जाणार आहे. *
What's Your Reaction?






