अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप महापालिकेच्या चोख नियोजन व्यवस्थेमुळे, गणपती विसर्जन सुरळीतपणे संप्पन्न

अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप  महापालिकेच्या चोख नियोजन व्यवस्थेमुळे, गणपती विसर्जन सुरळीतपणे संप्पन्न

विरार :  मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी वसई विरार शहरात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. मंगळवारी एकूण ३ हजार ४६० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, त्यापैकी १ हजार ६३३ कृत्रिम तलावात झाले. यात १ हजार ५५८ घरगुती गणेश आणि ७५ सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या. म्हणजेच ऊर्वरीत १ हजार ८२७ मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक तलावात, खाडी आणि समुद्रात झाले. अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाच्या दिवशी वसई विरार शहर महानगरपालिकेने केलेले नियोजन आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयीसुविधा यामुळे विसर्जन सोहळा शिस्तबध्द, शांततेत आणि भक्तीमय वातावरणात संप्पन्न झाला. 

मंगळवारी, वसई विरार मध्ये अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जन मिरवणुका निघाल्या. महानगरपालिकेचे साडेतीन हजारांहून अधिक मनुष्यबळ विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते. नागरिकांना  विसर्जनाचे स्थळांची माहिती सहज मिळावी यासाठी जिओ टॅग लोकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने ३ ठिकाणी जेट्टीच्या ठिकाणी विशेष तयारी बरोबर बोटी आणि तराफे अशी विसर्जनाची सुविधा केली होती. त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी  नियोजन पाहाणी करत होते. निर्माल्य तलवात आणि नदीत विसर्जित करू नये यासाठी जागोजागी निर्माल्य कलश सुद्धा ठेवले ठेवण्यात आले होते. अग्निशमन विभागाच्या वतीने समुद्र किनारी विसर्जनस्थळी लाईफ जॅकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात ठेवण्यात आली होती.यासह जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. विसर्जन ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ही बसविण्यात आले होते. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी असे साडेतीन हजार मनुष्यबळ उपलब्ध होते. विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास  त्यांच्यावर तातडीने उपचार मिळावे यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाकडून प्रभाग निहाय आरोग्य पथके ही विसर्जन स्थळी नियुक्त करण्यात आली होती. याशिवाय १५ रुग्णवाहिका आणि जागोजागी फिरत्या शौचालयाचीं सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.


कृत्रिम तलावात ५८.९१ टक्के विसर्जन

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावा यासाठी पालिकेने विसर्जनासाठी  ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. तर २ बंद असलेल्या दगड खाणींच्या ठिकाणी कन्वेअर बेल्टची सुविधा उपलब्ध करून दिली होती. वसई विरार मधील गणेशभक्तांनी महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. गणेशोत्सवाच्या एकूण १० दिवसांच्या काळात दीड दिवसीय, पाच दिवसीय, गौरी-गणपती, सात दिवसीय आणि अनंत चतुर्दशी या विसर्जनादरम्यान एकूण ३३ हजार ७०१ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, यात १९ हजार ८५३ मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. एकूण १९ हजार ५१८ घरगुती आणि ३३५ सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले. म्हणजेच दहा दिवासात एकूण विसर्जनाच्या ५८.९१ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow