नवज्योती महिला मंडळाच्या वतीने कँडल मार्च

वासई:कोलकाता, बदलापूर आणि देशाच्या विविध भागांत महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक शोषण, बलात्कार आणि हत्या याविरोधात नवज्योती महिला मंडळाच्या वतीने २५ ऑगस्ट २०२४ रोजी कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
मार्चची सुरुवात समाज सेवा मंडळापासून झाली आणि निर्मळ येथे त्याचा समारोप झाला. कँडल मार्चनंतर आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महिलांच्या हक्क आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. विजयशेठ पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचारांना तातडीने थांबवण्यासाठी कठोर कायदे आणि उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. एलएनटी कंपनीचे सीओओ श्री. राजू दोडती यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री. ओनील आलमेडा यांनी महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आणि त्यासाठी लढण्याचे आवाहन केले.
हिंदुजा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. संपदा देसाई यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आणि कर्करोगाच्या निदान व उपचाराबाबत माहिती दिली. त्यांनी महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष श्री. रुपेश रॉड्रिग्ज, समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. एलायस डाबरे, माजी अध्यक्ष श्री. नेल्सन डिसोझा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. नीता डाबरे, सौ. नलिनी दोडती, खजिनदार सौ. ज्योत्सना डाबरे, सौ. मेबल दोडती आणि सौ. कॅथरीन दोडती यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत परिचय सौ. नीता डाबरे यांनी केले, तर सौ. नलिनी दोडती यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य शिबिराचे सूत्रसंचालन सौ. मेबल दोडती यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमाने महिलांच्या सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर समाजाच्या लक्ष वेधले आणि त्यांच्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची गरज अधोरेखित केली.
What's Your Reaction?






