नालासोपारात शिवसेनेचा चक्का जाम! एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी

नालासोपारात शिवसेनेचा चक्का जाम!  एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी

विरार : एसटी महामंडळाने एसटीच्या दरात केलेल्या भाडेवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नालासोपारा एसटी आगारात मंगळवार, 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘चक्का जाम` आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनातून राज्य सरकारच्या निर्णयाचा धिक्कार करण्यात आला. एसटी महामंडळाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी या प्रसंगी शिवसेनेने लावून धरली. या मागणीचे निवेदन शिवसैनिकांच्या वतीने आगार व्यवस्थापकांना देण्यात आले.

वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यामुळे एसटीवर जवळपास तीन कोटी रुपयांचा बोजा पडत आहे, असे कारण पुढे करत एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीमुळे तिकीट दरात 14.97 टक्के वाढ होणार आहे. 24 जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. खेरीज; रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यातही 3 रुपयांची दरवाढ 1 फेब्रुवारीपासून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

एसटी ही सर्वसामान्यांसाठी हक्काचे वाहन आहे. ग्रामीण आणि शहरी जनतेसाठी ती जीवनरेखा आहे. त्यामुळे या भाडेवाढीमुळे गरीब व मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे. याविरोधात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलना`ची हाक दिलेली होती. 

या आदेशांनुसार, शिवसेना पालघर जिल्हा व वसई तालुक्याच्या वतीने नालासोपारा (पश्चिम) एसटी आगारात चक्का जाम करण्यात आले. या आंदोलनात महिला आघाडी, युवासेना, संलग्न संघटना आणि शिवसैनिक सहभागी झाले होते, अशी माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली. उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, तालुकाप्रमुख स्वप्निल बांदेकर, जिल्हा उपसंघटक भारती गावडे, तालुका संघटक प्रभा सुर्वे, शहरप्रमुख उदय जाधव, प्रदीप सावंत, प्रणब खामकर, शहर संघटक रुचिता विश्वासराव, पवित्रा चंदा, अल्पसंख्याक सेना अझहर खान, उत्तर भारतीय सेना राज सिंग, जिल्हा उपअधिकारी रोहन चव्हाण, जिल्हा सचिव प्रतीक जाधव आदींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग दाखवला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow