पालघर: पालघर जिल्हा जात पडताळणी समितीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपानुसार, उपायुक्त विशाल नाईक आणि संशोधन अधिकारी समाधान इंगळे यांच्या नेतृत्वाखालील समिती विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करून त्यांना नाहक त्रास देत आहे. या आरोपांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थी आणि पालक यांचे अर्ज विहित मुदतीत स्वीकारले जात नाहीत किंवा उगाचच अडवले जात आहेत. या प्रक्रियेत भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः, जिल्हा जात पडताळणी समितीने जे अर्ज रिजेक्ट केले, त्यांना उच्च न्यायालयात दाद मागावी लागते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल नारायण ठाकुर यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना ईमेल आणि पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. याचबरोबर, दोषी अधिकाऱ्यांना पालघर येथून तात्काळ हटवून नव्याने समिती स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

प्रफुल्ल नारायण ठाकुर यांनी पीडित विद्यार्थी आणि पालक वर्गाला आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात आंदोलनात्मक न्याय हक्काच्या लढ्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक ८७६७१०३९२९ वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

या प्रकरणाने पालघर जिल्ह्यात खळबळ उडवली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आता पाहावे लागेल की या आरोपांवर शासन काय पावले उचलते.