पुणे - शहरातील २२६ मूर्ती विक्रेत्यांना नोटिसा

पुणे: रस्ता आणि पादचारी मार्ग अडवून गणेश मूर्ती विक्रीचे दुकान थाटणाऱ्या २२६ व्यावसायिकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. तर शिवाजीनगर घोले रस्ता रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील तीन मंडळांनी मान्यतेपेक्षा जास्त जागा व्यापल्याने त्यांनाही नोटीस काढली आहे.
यंदाचा गणेशोत्सव सात सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी पुणेकरांकडून गणेश मूर्तीचे बुकिंग केले जात आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी होते. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत. पण हे स्टॉल पादचारी मार्ग, रस्त्यावर लावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. महापालिकेकडून गणेश मूर्ती विक्रीसाठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत तेथे दुकान न थाटता विक्रेते त्यांच्या सोईनुसार मांडव घालून मूर्ती विक्री सुरु करतात.
शहरात आत्तापर्यंत २२६ मूर्ती विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना वाहतुकीस अडथळा आणणारे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३४ नोटीस सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने दिल्या आहेत. तर येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकाही मूर्ती विक्रेत्याला नोटीस बजावलेली नाही.
What's Your Reaction?






