भारत सरकारने ट्विटरला खडसावले : विमानांना बॉम्ब स्फोटाच्या धमकीचे प्रकरण

भारत सरकारने ट्विटरला खडसावले : विमानांना  बॉम्ब स्फोटाच्या धमकीचे प्रकरण

दिल्ली : गेल्या काही दिवसांत विविध विमान कंपन्यांना 100 हून अधिक वेळा बॉम्ब स्फोटांच्या धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आज, बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला (ट्विटर) खडसावले आहे. आजवरच्या सर्व धमक्या ट्विटरवरूनच देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी एअरलाइन्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत एक्स आणि मेटा सारख्या व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भोंडवे म्हणाले की, आता परिस्थिती अशी झाली आहे की, जणू काही एक्स या गुन्ह्यांना प्रोत्साहन देत आहे. अशा धोकादायक अफवा पसरवण्यापासून रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? असा सवाल त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना विचारला.

गेल्या काही दिवसांत भारतीय विमान कंपन्यांच्या 120 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. काल देखील इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या 30 फ्लाइट्सना अशा धमक्या आल्या होत्या. या धमक्यांबाबत एअरलाइन्सने सांगितले की, त्यांनी मानक ऑपरेटिंग प्रक्रियांचे पालन केले, अधिकाऱ्यांना सतर्क केले गेले आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले गेले.

नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड न करता सरकार या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा खोट्या धमक्या देणाऱ्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यासह त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागरी विमान वाहतूक सुरक्षेच्या विरोधात बेकायदेशीर कृतींविरुद्ध कायदे कडक करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या, उड्डाण सुरक्षा नियम प्रामुख्याने उड्डाण दरम्यान होणाऱ्या गुन्ह्यांचा समावेश करतात.

यासंदर्भात नायडू म्हणाले की, आम्ही कायद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि कायदेशीर पथकाने त्यावर काम केले आहे. ते म्हणाले की, आम्हाला इतर मंत्रालयांशी देखील सल्लामसलत करणे आवश्यक आहे, आम्ही निश्चितपणे या कायद्यातही बदल करण्यासाठी पुढे जात आहोत. या धमक्यांमागे काही षडयंत्र असू शकते का, असे विचारले असता, सखोल चौकशी सुरू असून सर्व काही उघड होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow