महापालिकेच्या उदासीनतेने घडवला मृत्यू, आता मृत्यू दाखल्यासाठी पालिकेच्या फेऱ्या – ग्रंथ मुथाच्या कुटुंबीयांची व्यथा

भायंदर (पूर्व): महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील सार्वजनिक तरण तलावात बुडून ग्रंथ मुथा (वय 9) या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर महिनाभर उलटूनही मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता या दुर्दैवी घटनेत मुलगा गमावलेल्या कुटुंबाला मृत्यू दाखल्यासाठी देखील महापालिकेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, ही अतिशय खेदजनक बाब समोर आली आहे.
घटनेनंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने एक महिन्यापूर्वीच शासनाला आपला अहवाल सादर केला आहे. मात्र, क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनावर आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. न्यायासाठी दरवाजे झिजवणाऱ्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत आहे.
काही दिवसांपासून ग्रंथच्या आजोबांनी (आईचे वडील) महापालिकेत मृत्यू दाखल्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, नव्या नियमानुसार दाखले विभागीय कार्यालयातून दिले जात असल्याचे सांगण्यात आले. प्रक्रियेची स्पष्ट माहिती नसल्यामुळे त्यांची धावपळ सुरूच होती.
शुक्रवारी, सकाळी 10 वाजता ते दाखल्यासाठी महापालिकेत हजर झाले. त्यांना टोकन क्रमांक 18 मिळाले आणि पुढील दोन तास प्रतीक्षा करावी लागली. या कालावधीत ग्रंथची आई अश्रूंना आवर घालू शकली नाही. एक महिला कर्मचाऱ्याने विचारणा केल्यानंतर तिची ओळख समजताच प्रशासनाची घाई सुरू झाली आणि दाखल्याची प्रक्रिया तात्काळ करण्यात आली.
दाखला मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी आश्चर्यकारक चूक निदर्शनास आणली – ग्रंथचा मृत्यू महापालिकेच्या तरण तलावात झाला असतानाही, दाखल्यावर ‘तुंगा हॉस्पिटल’ हे मृत्यूस्थान नमूद करण्यात आले आहे. ही चुकीची नोंद दोषींवर कारवाई टाळण्यासाठी केलेली असल्याचा संशय मूथाच्या आईने व्यक्त केला. त्यामुळे तिने असा चुकीचा दाखला घेण्यास नकार दिला.
या संदर्भात विचारणा केली असता उपायुक्त शाद शिंगटे यांनी माहिती घेतली जात असल्याचे सांगितले. मात्र, या साऱ्या प्रकरणामुळे पालिकेच्या कामकाजातील असंवेदनशीलता आणि नियोजनशून्यता अधोरेखित झाली आहे.
What's Your Reaction?






