मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे समर्थक भिडले

मालवण:सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत यांचा समावेश आहे. मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते तसेच नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
नेमकं काय घडलं?
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही सहभाग होता. मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावरील आले. मात्र, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील, विनायक राऊत हे किल्ल्यावरती गेलेले असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांना राजकोट किल्ल्यावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं.
त्यामुळे नारायण राणे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे यांचे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक होत ते बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनीही किल्ल्यावर काहीवेळ ठिय्या आंदोलन केलं. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरादार घोषणाबाजी केल्यामुळे काहीवेळ राजकोट किल्ल्यावर ताणाव निर्माण झाला होता. मात्र, यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करत समजूत घातली. यानंतर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील हे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले.
What's Your Reaction?






