मुंबई: मालाड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भयंकर रोड रेज घटनेत मनसे कार्यकर्ता आकाश माईन यांचा जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आकाश माईन यांच्या पत्नी अनुश्री माईन यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश माईन (वय ३१) हे मनसे कार्यकर्ता असून हैदराबादमध्ये वास्तव्यास होते. दसऱ्याच्या निमित्ताने ते मुंबईत आले होते. १३ ऑक्टोबर रोजी मालाड पूर्व शिवाजी चौकातून दुचाकीवर जात असताना एका रिक्षाचालकाशी त्यांचा वाद झाला. या वादामुळे रिक्षाचालकाचे मित्र आणि काही स्थानिक फेरीवाले एकत्र जमले. त्यांनी मिळून सुमारे १० ते १५ जणांच्या जमावाने आकाशवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आकाश माईन यांना तात्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला.


पोलिसांनी तातडीने तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दीपक आमटे, राकेश मलकु ढवळे आणि साहिल सिकंदर कदम या सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत.या घटनेबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आकाश माईन हे विभाग सचिवांचे मुलगे होते. रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सरकारने अशा घटनांना आळा घालावा, आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” असे त्यांनी सांगितले.

अविनाश कदमविरोधात यापूर्वी पंतनगर आणि बोरीवली पोलीस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत, तर आदित्य सिंह आणि जयप्रकाश आमटेविरुद्ध २०१९ मध्ये दिंडोशी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंदवला गेला होता.या घटनेवर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ही घटना वाढत्या गुन्हेगारीचे गंभीर परिणाम दर्शवते आणि जमावाच्या हल्ल्यामुळे किती मोठे संकट निर्माण होऊ शकते, हे अधोरेखित करते. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई कशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.