मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी केले ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक

ठाणे:स्वतःचे कार्यालयाचे काम, घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत, नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले.
ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सृजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, माजी नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त मीनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितील, कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरूखकर आदी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे ४२ वे वर्षे आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्षे ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात. यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटला.
What's Your Reaction?






