लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी विघ्न आणल्याचा फडणवीसांचा आरोप; महाविकास आघाडीवर टीका

पुणे, : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत अनेक अडथळे आणण्याचा आणि योजना बदनाम करण्याचा आरोप विरोधकांवर केला आहे. पुण्यात आयोजित या योजनेच्या औपचारिक सुरुवातीच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी विरोधकांनी योजनेत विघ्न आणण्यासाठी केलेल्या कारनाम्यांचा पाढाच वाचला.
फडणवीस म्हणाले, "आज खऱ्या अर्थाने सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात पुण्यातून होत आहे. पुणे हे केवळ राजकारणच नाही तर समाजपरिवर्तनाची भूमी आहे." त्यांनी पुणेच का निवडले याचे स्पष्टीकरण देताना सावित्रीबाई फुले आणि जिजाऊंच्या कार्याचा उल्लेख केला.
योजनेच्या अंमलबजावणीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "आतापर्यंत १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले आहेत, आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही." त्यांनी योजनेची गती दर्शवताना याला "फटाफट योजना" असं नाव दिलं आणि सांगितलं की थेट पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत.
विरोधकांचे कारनामे:
फडणवीस यांनी आरोप केला की, "आम्ही घोषणा केली तेव्हा सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. त्यांनी कोर्टात जाऊन फॉर्म भरताना पुरुषांचे फोटो लावले, मोटर सायकल आणि बगिच्यांचे फोटो लावले." त्यांनी असेही सांगितले की विरोधकांनी पोर्टलवर जंक डेटा टाकून त्याला बंद पाडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोर्टल पाच सहा दिवस बंद राहिले.
फडणवीस यांनी विरोधकांच्या या प्रयत्नांवर टीका करताना सांगितले की, "आम्ही ऑफलाइन अर्ज घेऊन पोर्टलवर टाकले," असे ते म्हणाले. त्यांच्या मते, सरकारच्या या योजनेला विरोधकांकडून अडथळे येत असले तरी, योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






