वसईच्या २९ गावांच्या समावेशाबाबत १६ डिसेंबरपासून सुनावणी

विरार - विधानसभा निवडणुकीनंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेत २९ गावे पुन्हा सामाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने ३१ मे रोजी अधिसूचना जाहीर केली होती. तसेच त्यावर हरकतीही मागविण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात प्रशासनाकडे काही अर्ज आले असून त्यातील महापालिकेतून गावे वगळू नयेत म्हणून ११ हजार ५९१, महापालिकेतून गावे वगळावीत म्हणून १९ हजार ७९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या हरकतींवर १६ ते २० डिसेंबरपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यलयात सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच या सुनावणीसाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
३ जुलै २००९ रोजी राज्य सरकारने विरार, नालासोपारा, नवघर माणिकपूर आणि वसई नगरपालिकेसह ५३ गावांचा समावेश करून वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना केली. त्यानंतर काही गावे महानगरपालिकेतून वगळण्यासाठी मोठे आंदोलन वसईत झाले. मात्र, राज्य सरकारने ३१ मे २०११ रोजी महापालिकेतून वगळलेल्या २९ गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करण्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली. तेव्हापासून गावांचा प्रश्न आजपर्यंत मार्गी लागेलला नाही.
१६ ते २० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या सुनावणीत पालिकेच्याही पथकांचा समावेश असणार असून वसई विरार शहर महानगरपालिकेडून १५ पथके नियुक्त केली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त हे पथकांचे प्रमुख असणार आहेत. अर्जांची छाननी करणे, सुनावणी नोटीस बजावणे, सुनावणी घेणे आणि अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी या पथकांवर असणार आहे.
What's Your Reaction?






