वसई कला क्रीडा महोत्सव : 'भारताची वैभवशाली गाथा' प्रदर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी
कलाकृतीतून दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला होणारी आणि भारताची शान असणारी परेड मिनीएचर (लहान प्रतिकृती ) स्वरूपात पाहण्याची संधी वसईकरांना उपलब्ध झाली आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

वसई - वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे यंदा ३५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने मुकेश सावे यांच्या संकल्पनेतून आणि विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने 'आपल्या भारताची वैभवशाली गाथा' ही विशेष कलाकृती वसईत साकारण्यात आली आहे. या कलाकृतीतून दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला होणारी आणि भारताची शान असणारी परेड मिनीएचर (लहान प्रतिकृती ) स्वरूपात पाहण्याची संधी वसईकरांना उपलब्ध झाली आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
या प्रदर्शनाची सुरुवात इंडिया गेटने करण्यात आली असून ज्याप्रमाणे कर्तव्य पथावर सैन्य दलाचे संचलन होते त्याच प्रमाणे प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे. यात अगदी सैनिकांच्या छोट्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून, सैन्यदलातील विविध दले, रेजिमिंट यांच्या ड्रेसकोडसह अगदी बारकाईने परेड करतानाच्या सैनिकांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. तसेच या कलाकृतीतून देशाचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक विविधता, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, विमाने आणि शस्त्रास्त्रांसह भारताची संरक्षणात्मक ताकद दाखविण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाला भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी प्रत्येक राज्याकडून चित्ररथाद्वारे प्रदर्शन करण्यात येते असेच चित्ररथ या प्रदर्शनात देखील साकारण्यात आले असून यात भारताच्या विविध राज्यांची संस्कृती पाहता येणार आहे. तसेच भारताने इस्रोच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रात केलेली कामगिरी देखील दाखविण्यात आली आहे. प्रदर्शनात राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती लक्षवेधी असून भवनाची भव्यता लक्षात घेऊन हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे.
'भारताच्या सांस्कृतिक वैभवाची, प्रगतीची आणि लष्करी सामर्थ्याची झलक पाहता यावी तसेच आपल्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना दृढ यासाठी या प्रदर्शनाचे आजोजन करण्यात आले आहे.' - प्रकाश वनमाळी, सरचिटणीस, वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ
कधी पर्यंत आणि कुठे पाहता येणार हे प्रदर्शन ?
हे प्रदर्शन वसई विकास बँकेच्या मुख्यालय परिसरात साकारण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३ जानेवारी २०२५ पर्यंत खुले असणार आहे त्यानंतर विरार येथील विवा महाविद्यालयात कायम स्वरूपात हे प्रदर्शन संग्रहित केले जाणार आहे.
What's Your Reaction?






