वसई विरार सह मीरा-भाईंदर मध्ये पोलिसांची झाडझडती

वसई : सण उत्सव निर्विघ्नपणे पार पडावेत यासाठी पोलीस आयुक्तालय मार्फत यावर्षी विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेगार शोध मोहिमा राबवण्यात आल्या. यावेळी रेकॉर्डवर असलेल्या गुंडांची माहिती संकलित करण्यात आली. गुन्हेगारांच्या कारवायांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी हद्दपारी, स्थानबद्ध. मोक्का यांसारख्या कारवायांचे कायदेशीर हत्यार उपसले जाते. एका गुन्हेगारावर कारवाई केल्यास त्याच्या साथीदारांना चाप बसतो. त्यामुळे पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईचा गुन्हेगारीवर परिणाम होतो. सणावारांच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या गुंडाची पाहणी करण्यात येते. सन २०२४, च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील १५७ गुंडांची पाहणी केली. यात १०९ गुंड मूळ पत्त्यावर सापडले तर ४८ गुंड मूळ पत्त्यावर राहत नसल्याचे आढळले आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिला हवा यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक ठरते. वारंवार गुन्हे करणाऱ्यास हद्दपार करणे, आर्थिक लाभासाठी टोळी निर्माण करून संघटितपणे गुन्हे करणाऱ्यांना 'मोक्का' अंतर्गत कारवाई करणे, तसेच वारंवार गुन्हे करून कायद्याला न जुमानणाऱ्यांवर 'एमपीडीए' अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करता येते. आयुक्तालयात विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर पोलिस दलाच्या वतीने उपायुक्तांकडे प्रस्ताव सादर करून त्यांच्यावर मोक्का व अन्य प्रकारच्या कारवाया केल्या जातात. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तात्पुरती हद्दपार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्ताच्या हद्दितील गुंडांच्या पाहणीची विशेष मोहीम आखली होती. यामधे विविध पोलीस ठाण्यात एकूण ३० मोहिमा संपन्न झाल्या. सदर मोहिमेमध्ये काशिमीऱ्यात ४ ठिकाणी भेटी दिल्या यात ५ गुंडांचे पत्ते तपासले परंतु कुणीच सापडले नाहीत. काशी गावात १ मोहिम ८ जणाच्या तपासणीत ६ जण सापडलेले नाहीत. मीरा रोड २ मोहिमा ६ जणा पैकी २ गुंड सापडले नाहीत. नवघर ४ मोहिमेत ९ जणा पैकी ४ सापडले नाहीत. नयानगर एका मोहिमेत १२ पैकी एक गुन्हेगार सापडलेला नाही. भाईंदर २ मोहिमा ६ पैकी ३ सापडलेले नाहीत. उत्तन मधे एका मोहिमेत ५ जण सापडले. वसईत एका महिमेत ८ जण सापडले. माणिकपूर मधे एका मोहिमेत ७ पैकी ५ जण सापडलेले नाहीत. नायगावात कुठलीच मोहिम झाली नाही. तुळींज मधे एका मोहिमेत तीन पैकी एक जण बेपत्ता आहे. वालीव मधे एकूण ४ मोहिमा झाल्या. त्यात २७ पैकी १२ गुंड गायब आहेत. आचोळ्यात ८ पैकी २ जण आढळलेले नाहीत. नालासोपाऱ्यात ४ महिमेत ६ पैकी २ जण बेपत्ता आहेत. अर्नाळ्यात ३ जण आढळले. विरार मधे ३३ पैकी ७ जण गायब आहेत. पेल्हार मधे ११ पैकी ३ गुंड गायब आहेत. मांडवीत मोहिम आखली नव्हती. या सर्वेक्षणावरून ४८ आरोपी मूळ पत्त्यावरून गायब झालेले आहेत. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महिनाभरात १५७ आरोपींची तपासणी करण्यात आली. मात्र, बेपत्ता असलेले ४८ हे आरोपी मूळ गावी अथवा परराज्यांत असल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्तालयात १८ पोलिस ठाणी असून, या पोलिस ठाण्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर महिनाभरात १५७ आरोपींच्या घरांची पाहणी व तपासणी करण्यात आली. अशा सण उत्सवाच्या काळात अप्रिय घटना घडू नये तसेच नागरिकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत माहिती देत असताना, सहायक पोलिस निरीक्षक व जनसंपर्क अधिकारी श्रीकांत करांडे यांनी व्यक्त केले आहे.
What's Your Reaction?






