वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या विरोधात राज्यातील सर्व मच्छिमार उतरणार रस्त्यावर उत्तन येथे झालेल्या सभेत मच्छिमारांनी केला निर्धार.

वसई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते दिनांक ३०/०८/२०२४ रोजी होणाऱ्या वाढवणं बंदराच्या भूमिपूजन सोहळ्याला राज्यातील मच्छिमारांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून ह्या भूमिपूजनाला राज्यातील मच्छिमार कडाडून विरोध करणार असल्याचे दिनांक २८/०८/२०२४ रोजी उत्तन, भाईंदर येथे झालेल्या समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी माहिती दिली.
वाढवणं बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत. मच्छिमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही परंतु विकासाच्या नावाखाली मच्छिमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि अश्या विध्वंसक प्रकल्पनां कडाडून विरोध हा समाज शेवट पर्यंत करत राहणार असल्याचे समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी सांगितले.
उत्तन येथे झालेल्या बैठकीत मच्छिमारांचे कोण कोणत्या पद्धतीने नुकसान होणार ह्याचे सविस्तर चर्चा करण्यात आली असून ह्या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छिमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा सातपाटी येथील मासेमारी व्यवसाय बाधित होणार आहेत कारण समुद्रातील एकूण ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या (CMFRI) अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले असल्यामुळे ह्या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून विरोध होणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांच्या कडून सांगण्यात आले.
ह्या सभेत भूमिपूजनाचा कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वाढवण किनाऱ्यावर होणाऱ्या सरकारच्या प्रेत यात्रा आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छिमार सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच वसई येथील मच्छिमार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तन, मढ, मर्वे, गोराई येथील मच्छिमार समुद्रात जल समाधी घेऊन आणि काळे झेंडे दाखवून विरोध करणार असल्याचे डिमेलो यांनी माहिती दिली.
सदर सभेला मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया, उत्तन वाहतूक संस्थेचे चेअरमन विंसन बांड्या, उत्तन विकास संस्थेचे जॉन गऱ्या , वसई मच्छिमार संस्थेचे चेअरमन नाझरेथ गोडबोले, एडविन केळीखादया, जॉन्सन भयाजी डिकसन डीमेकर, पास्कु मनभाट, स्टीफन कासुघर, डोंगरी चौक मच्छिमार संस्थेचे विलियम गोविंद, पास्कोल पाटील, मनोरी मच्छिमार संस्त्थेचे चंद्रकांत फाजींदार, पाली मच्छिमार संस्थेचे माल्कम कासुकर, लीन्टन मुनिस, लॉरेन्स घोसाल, सचिन मिरांडा, भाटी मच्छिमार संस्थेचे जितेंद्र कोळी, उत्तन मच्छिमार विविध संस्थेचे अंतोनी ताण्या, किशोर कोळी, भाटेबंदर मच्छिमार संस्थेचे रुपेश डिमेकर आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






