वसई, २१ जून: वसई पश्चिमेतील भुईगाव व सुची समुद्रकिनाऱ्यावर मागील काही दिवसांपासून वादळी वारे आणि समुद्रातील भरतीमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. या किनारपट्टीवरील सुच्या झाडांवर लाटांचा जोरदार तडाखा बसत असून, काही झाडे पूर्णपणे उन्मळून पडली आहेत. परिणामी, या परिसरातील सुच्या बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशी चिंता पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

भुईगाव व सुची बाग परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला असून, येथे पर्यटकांसह विविध जातीचे पक्षीही मोठ्या प्रमाणात येतात. या भागात मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या सुच्या बागा हे या परिसराचे वैशिष्ट्य ठरल्या आहेत. मात्र, बेसुमार वाळू उपसा, समुद्राची धूप आणि लाटांचा तडाखा यामुळे दरवर्षी हजारो सुची झाडे कोसळत आहेत.

बुधवारी आलेल्या जोरदार भरतीमुळे प्रचंड लाटा किनाऱ्यावर उसळल्या आणि त्यांचा मोठा फटका या झाडांना बसला. यामध्ये शेकडो सुची झाडे उन्मळून पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या समस्येवर धूपतिबंधक बंधाऱ्यांची उभारणी ही एकमेव शाश्वत उपाययोजना असू शकते, मात्र अद्याप ती वास्तवात उतरलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते मॅकेझी डाबरे यांनी सांगितले की, "या बंधाऱ्यासाठी यापूर्वी १.८० कोटी रुपये मंजूर झाले होते आणि आता आपत्ती व्यवस्थापन योजनेतून ४.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तरीही अद्याप बंधाऱ्याचे काम सुरू झालेले नाही."

त्यामुळे किनाऱ्यावरील नैसर्गिक संपत्ती धोक्यात येत असून, भविष्यात या बागा पूर्णपणे नामशेष होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले, “वर्षानुवर्षे आम्ही यासाठी पाठपुरावा करतोय, पण प्रशासनाचे दुर्लक्ष अजूनही कायम आहे.”

या परिसरातील सुच्या बागा केवळ सौंदर्यवर्धकच नाहीत, तर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे यांचे संवर्धन करणे ही केवळ स्थानिक प्रशासनाची जबाबदारी नसून, ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही मत व्यक्त होत आहे.