वाहतूक पोलिसांच्या वर्दीत ‘कॅमेरा’; मिरा भाईंदर वसई-विरारमध्ये बॉडीवॉर्न कॅमेरांची सुरुवात

भाईंदर: वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मिरा भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयातर्फे वाहतूक पोलिसांना बॉडीवॉर्न कॅमेरे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कॅमेरांमुळे रस्त्यावर घडणाऱ्या घटनांचे थेट रेकॉर्डिंग होणार असून, कायदेशीर बाबतीत पुरावे मिळवणे आणि नागरिकांशी होणाऱ्या संवादात पारदर्शकता राखणे शक्य होणार आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते अधिकारी आणि अमलदारांना २० कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. एकूण २०० कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उर्वरित कॅमेरे टप्प्याटप्प्याने वितरित केले जाणार आहेत.
बॉडीवॉर्न कॅमेरा हे उपकरण थेट पोलिसांच्या वर्दीवर लावले जाते. यात ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगची क्षमता असून, दररोज चार्ज करून वापरणे शक्य आहे. यामध्ये जवळपास ३० दिवसांचा डेटा साठवण्याची सोय आहे, जे भविष्यातील चौकशीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
हे कॅमेरे जीपीएस तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ते पोलिस नियंत्रण कक्षाशी थेट जोडले गेले आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्षासही पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील स्थितीची त्वरित माहिती मिळू शकणार आहे. ट्राफिक जाम, महामार्गावरील गोंधळ आणि संवेदनशील घटना रेकॉर्ड करणेही यामुळे सुलभ होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत पोलिस यंत्रणेला अधिक पारदर्शक, जबाबदार आणि तंत्रस्नेही बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
रस्त्यावरील कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने बॉडीवॉर्न कॅमेरे हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
What's Your Reaction?






