विरार-ग्लोबल सिटीला ‘विजयादशमी`च्या मुहूर्तावर पाणी मिळणार!

विरार : विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटीला ‘विजयादशमी`च्या मुहुर्तावर पाणी देण्याचा निर्णय अखेर पालिकेने घेतला आहे. त्यामुळे 15 हजारहून अधिक सदनिकांत राहणाऱ्या तब्बल 50 हजार रहिवाशांची पाणीसमस्या निकाली निघणार आहे. फेब्रुवारीपासूनच ग्लोबल सिटीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा नारळ असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनीच वाढवला होता. मात्र दरम्यानच्या काळात चंदनसार येथून ग्लोबलसिटीपर्यंत येणाऱ्या जलवाहिनीवर तब्बल 13 लिकेज सापडले होते. त्यानंतरही ही जलवाहिनी सातत्याने नादुरुस्त होत होती. या जलवाहिनीवरील समस्या शोधण्यात, त्यांच्या दुरुस्ती आणि जलवाहिनी बदलीत वेळ गेल्याने ग्लोबल सिटीला पाणी मिळण्यास विलंब झाला, असा खुलासा पालिकेने नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केला आहे. 

गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी पालिका अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीतून आमदार क्षितिज ठाकूर यांनी या कामाचा विस्तृत आढावा घेतला. चर्चेअंती विरार-क्लब वन येथील जलकुंभाद्वारे ‘विजयादशमी`च्या मुहूर्तावर ‘ग्लोबल सिटी`ला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय पाणीपुरवठा करण्यासाठी करावी लागणारी आवश्यक कामे आणि दुरुस्तीही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीतून अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

ग्लोबलसिटी येथील अंदाजित 15 हजार फ्लॅट व त्यात राहणाऱ्या तब्बल 50 हजारहून अधिक लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी विरार-क्लब वन येथे 20 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून बनविण्यात आला आहे. सूर्या पाणीपुरवठा योजनेतून मिळणाऱ्या 185 दशलक्ष लिटर पाण्यापैकी 85 दशलक्ष लिटर पाणी वसई-विरार महापालिकेला पहिल्या टप्प्यात एमएमआरडीएकडून देण्यात आलेले आहे. आतापर्यंत टँकरवर निर्भर असलेल्या ग्लोबलसिटीवासीयांनाही या पाण्याची प्रतीक्षा होती. मात्र आता या जलकुंभातून उपलब्ध होणाऱ्या प्रतिदिन दीड दशलक्ष लिटर्स पाण्यातून ग्लोबल सिटीची तहान भागणार आहे. सुरुवातीला पालिकेकडून या ठिकाणी असलेल्या जुन्या जमिनीखालील 13 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभात जलसंचय करण्यात येत होता. पालिका अधिकाऱ्यांच्या माजी सभापती प्रफुल्ल साने यांनी निदर्शनास आणून दिली. त्याऐवजी नवीन जलकुंभात जलसंचय करावा, म्हणजे पाणीपुरवठा योग्य दाबाने व सुरळीत होऊ शकेल, अशा सूचना त्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. 

सूर्या पाणी प्रकल्प टप्पा-2 ची सुरुवात 2017 साली झाली होती. पण शेतकरी मोबदला, वनविभाग, महामार्ग प्राधिकरण आणि अन्य विविध परवानगी तसेच कोविड संक्रमण काळ यात या योजनेला विलंब झाला. आज ही योजना 95 टक्के पूर्ण झालेली आहे. महापालिकेकडून अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठीची कार्यवाहीही पूर्ण झालेली आहे. त्यासाठी 67 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. याशिवाय पालिकेच्या मालकीच्या आणखी एका धरणासाठी 167 कोटींचा भरणा करण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच वसई-विरारकरांची पाण्याची पूर्तता होणार आहे. त्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर आणि सहकाऱ्यांना विपरित परिस्थितीत अथक परिश्रम घ्यावे लागले, या माहितीचा पुनरुच्चारही या वेळी माजी सभापती प्रफुल्ल साने यांनी केला.   

दरम्यान; ग्लोबल सिटीच्या सुरळीत व नियोजनपूर्वक पाणीपुरवठ्यासाठी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सूचनेनुसार, पाणी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. ही समिती वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून होणारी कामे आणि आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेऊन त्यांचा पाठपुरावा करणार आहे. याबाबतची सर्व ती माहिती आमदार क्षितिज ठाकूर यांना देण्याची जबाबदारीही या समितीवर सोपवण्यात आलेली आहे. या समितीत माजी नगरसेवक रंजन पाटील, किरण ठाकूर, प्रफुल्ल सानेआणि प्रशांत चौबळ यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

विशेष म्हणजे; आमदार क्षितिज ठाकूर यांच्याच उपस्थितीत 28 सप्टेंबर रोजी वसई-विरार महापालिकेच्या दिवाबत्ती, बांधकाम व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या तीनही विभागांशी संबंधित कामे पूर्ण करून घेण्याची मागणी करून ती पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून घेण्यात आले आहे. या बैठकीला ग्लोबल सिटीतील अनेक रहिवासीही उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow