शिवसेनेचा ‘स्वस्थ वसई; सदृढ वसई!`चा संकल्प! जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांची माहिती

विरार : आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे (23 जानेवारी) औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने ‘स्वस्थ वसई; सदृढ वसई!` या संकल्पनेंतर्गत शहरातील रिक्षाचालक, इमारतींचे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, असंघटित महिला-पुरुष कामगार आणि सर्व सोसायटी व चाळींतील नागरिकांसाठी ‘ईसीजी, शर्करा तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिरां`चे आयोजन करण्याचा संकल्प सोडण्यात आला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे. या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले.
यात महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकरता जनजागृती आणि योगा प्रशिक्षणासोबतच त्यांच्यासाठी ‘आरोग्य व्याख्यानां`चे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील सर्व रिक्षा स्टँडवर या शिबिरांचे आयोजन करण्याबरोबरच नागरिक सूचवतील; त्या ठिकाणी ही आरोग्य शिबिरे घेण्याचा शिवसेनेचा मानस आहे. याशिवाय; शाळा व शैक्षणिक संकुलांनी मागणी केल्यास या शिबिरांचे आयोजन त्या ठिकाणी केले जाणार आहे. तसेच ‘मोतीबिंदू` तपासणी व शस्त्रक्रिया यासाठीही आवश्यक मदत केली जाणार आहे, अशी माहितीही जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये, वसई शहर आणि परिसरात फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांत हा उपक्रम राबविण्यात येईल. या भव्य व व्यापक उपक्रमासाठी वसई-विरार शहरातील सर्व सामाजिक-शैक्षणिक-आरोग्य संघटना, आरोग्यमित्र, गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथके आणि वसई-विरार महानगरपालिका आरोग्य विभाग आणि औद्योगिक वसाहती यांनी सहकार्य करावे; तसेच या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. पंकज देशमुख यांनी केले आहे. भविष्यात हा उपक्रम जिल्हा पातळीवर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले
What's Your Reaction?






