भाईंदर :  मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ शेख यांनी मांडलेला प्रस्ताव अनेक अडीअडचणींचा सामना करत मंजूर झाल्यानंतर अखेर अनावरणाच्या प्रतीक्षेत असून नवनिर्वाचित महापौरांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे त्यामुळे शेख यांच्या दहा वर्षांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राज्यमंत्री दर्जा असलेले डॉ. आसिफ शेख यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी नगरसेवक असताना महापालिका  मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा प्रस्ताव मांडला होता.परंतु प्रस्ताव मंजूर होऊ शकला नव्हता. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी महापालिका आयुक्त आणि प्रशासक दिलीप ढोले यांना त्यांच्या अधिकाराखाली प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लेखी विनंती केली होती.

त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देऊन शासनाच्या संबंधित विभागा कडे पाठपुरावा केला. जेजे कला संकलन विभाग,पोलिस आयुक्त, महसूल विभागाची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पुतळा समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत सदर प्रस्तावाची मुदत संपल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांनी ९ जून २०२५ रोजी पुन्हा प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करून तो ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर निविदा मंजूर करण्यात आली आणि महात्मा गांधींचा पुतळा तयार करण्यात आला आहे. आता ३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन महापौरांच्या निवडीनंतर विधिवतपणे सदर पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.