वसई, २९ जून: विरार पश्चिमेतील अर्नाळा किल्ला समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मृतांची ओळख शिवाजी शिंदे (४८) आणि रंगीता शिंदे (४२) अशी असून, हे दोघे विरार पूर्वेच्या जी. एम. कॉलनी परिसरात, गुलाब स्वामी दर्शन इमारतीत राहत होते. शनिवारी सायंकाळी शिंदे दाम्पत्य अर्नाळा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. सायंकाळनंतरही ते किल्ला परिसरात फिरताना दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मात्र रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर दोन अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पुढील तपासात हे दाम्पत्य विरार पूर्वेहून आले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी घरच्यांना वज्रेश्वरी येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले होते, अशी माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना अपघात होती की आत्महत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.
Previous
Article