आगरी सेनेविरोधात वसई-विरार महापालिका अधिकाऱ्यांचे निषेध आंदोलन

विरार : वसई-विरार महापालिका अतिरिक्त आयुक्तांना दमदाटी व शिवीगाळ करत; त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करण्याचा तसेच कार्यालयातील साहित्य तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याने आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या विरोधात वसई-विरार महापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारच्या वेळेत वसई -विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या केबिनमध्ये आगरी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी विनापरवानगी जबरदस्तीने घुसून अतिरिक्त आयुक्तांना दमदाटी व शिवीगाळ केली होती.
तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करण्याचा तसेच कार्यालयातील साहित्य तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त यांच्या शेजारी असलेल्या महानगरपालिका आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेच्या निषेधारी शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयातील महासभा सभागृहात आयुक्तांच्या उपस्थितीत जाहीर निषेध सभा घेण्यात आली. या निषेध सभेस महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना अशाप्रकारे विनाकारण, हेतुपरस्पर धमकावणे व शिवीगाळ करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अशाप्रकारे दमदाटी व शिवीगाळ करणे हा प्रकार अतिशय निंदनिय असून याला आळा घालणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित येऊन पोलीस प्रशासन व शासन यांच्याकडे संबंधितांची तक्रार करण्याचे ठरविण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत हाताला काळी फित बांधून निषेध करणार आहेत.
What's Your Reaction?






