खाऊ गल्लीच्या धोकादायक नाल्यावर जबरदस्तीचे विकास काम

खाऊ गल्लीच्या धोकादायक नाल्यावर जबरदस्तीचे विकास काम

वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 'आय' प्रभाग समितीमध्ये अनावश्यक विकास कामे जोरात सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून येथील सुप्रसिद्ध खाऊगल्लीच्या गटाराचे जबरदस्तीचे विकासकाम सुरू करण्यात आले आहे. प्रभाग समिती 'आय' च्या बांधकाम विभागाने संरचनात्मक परीक्षण म्हणजेच 'स्ट्रक्चरल ऑडिट' मध्ये सदर नाल्यावरील स्लॅब धोकादायक घोषित केला असतानाही, पालिकेने याबाबत सुरक्षा नियमांची कुठलीच तरतूद न करता सदरचे विकास काम सुरू केले आहे. 

अधिक माहितीनुसार, 'आय' प्रभाग समितीतील नरवीर चिमाजी आप्पा मैदाना नजीक मुख्य नाल्याच्या गटारावर वादग्रस्त खाऊ गल्ली आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेच्या 'आय' प्रभाग समितीतील बांधकाम विभागाने सदरचे बांधकाम धोकादायक घोषित केले आहे तशा स्वरूपाचा अहवाल सादर केला आहे. असे असतानाही सदर खाऊगल्लीवर क्रिकेट खेळाकडून साठी वॉमअप स्पॉट , अनेक बेकायदेशीर हातगाड्या उभ्या असतात.  याबरोबरच नजीकच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा राबता असतो. पालिका प्रशासनाला या बांधकामाच्या निकृष्टतेची तसेच धोकादायक स्थितीची माहिती दिली आहे. 

तरी, पालिकेने या नाल्याच्या कठड्याचे विकासकाम जबरदस्तीने सुरू केले आहे. यासाठी सदर नाल्याचे बांधकाम फोडून लोखंडी सळ्या बाहेर काढलेल्याआहेत. आधीच सदर बांधकामाची धोकादायक अवस्था आहे. असे असताना ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्राण पणाला लावले आहेत. विशेष म्हणजे सदरचे विकासकाम सुरू असताना पालिकेचा एकही अभियंता जागेवर उपस्थित नाही. त्यामुळे ठेकेदाराचे मजूरच अभियंते बनून सदर धोकादायक स्थिती हाताळत आहेत. 

पालिकेचा कारभार प्रशासक चालवत आहेत. त्यामुळे अशा जबरदस्तीच्या विकासाची कामे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मर्जीतल्या ठेकेदारांना नसलेली कामे देऊन त्यांची 'बेकारी' दूर करण्याचा ठेका पालिकेच्या अभियंत्याने घेतला आहे. अशी माहिती करदात्या नागरिकांनी दिली.  

बांधकामाच्या ठेक्यांमध्ये ठरलेली नावे व ठरलेले ठेकेदार दिसून येतात. निविदा प्रक्रिया संपलेली असली तरीही, विकास कामे झाल्याचे दाखवून अशा ठेकेदारांना त्यांची देयके अदा केली जातात. याच लाडक्या ठेकेदारांना काळ्या यादीत न टाकता त्यांना शहरे बकाल करण्यासाठी जबरदस्तीची विकासकामे देण्यात पालिकेचे अभियंता अग्रेसर आहेत. शहरांचा चेहरा मोहरा बिघडवण्यासाठी पालिकेचे अभियंते हातभार लावत असतात. रस्ते, गटारे विविध उद्याने येथे पाहणी केली असता याचा प्रत्यय येतो.

पालिकेचे कार्यकारी अभियंता
प्रकाश साटम यांना विचारणा केली असता, सदर विकास कामाला मंजुरी दिल्याची माहिती दिली तसेच जे काम सुरू आहे त्याची कनिष्ठ अभियंत्यांकडून माहिती घेऊन कळवतो कारण नेमकी काय स्थिती आहे याची माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow