खासदार रवी किशन नालासोपारा ऐवजी वसईत प्रचाराला

वसई नालासोपारा मतदारसंघातील उत्तर भारतीय व भोजपुरी समाजातील मतदारांची मनधरणी करण्यासाठी मंगळवारी अभिनेते रवी किशन वसईत आले होते. त्याचा नालासोपाऱ्यात नियोजित दौरा होता मात्र ऐनवेळी त्यांनी नालासोपारा ऐवजी वसईत रोड शो केला.यावेळी त्यांनी चिंचोटी ते नायगाव मध्ये रोड शो करीत जनतेशी संवाद साधला. वसई व नालासोपारा दोन्ही मतदार संघात मागील काही वर्षांपासून उत्तरभारतीय व भोजपुरी समाजातील मतदारांची संख्या वाढली आहे. या मतदारांची मते आपल्याकडे वळविण्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही महायुती कडून प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी वसई विधानसभेच्या उमेदवार स्नेहा दुबे - पंडित यांच्या प्रचारार्थ भाजप नेते, खासदार रवी किशन वसईत दाखल झाले होते. सुरवातीला ते नालासोपारा मतदारसंघात राजन नाईक यांच्या प्रचाराला जाणार होते.
मात्र येण्यास विलंब झाल्याने ते रात्री वसई मतदारसंघात आले. यावेळी चिंचोटी ते नायगाव अशी प्रचार रॅली काढत रवी किशन यांनी रोड शो केला. वसई विरार शहरात आता मोठ्या संख्येने उत्तर भारतीय व भोजपुरी समाजाचे नागरिक राहत आहेत. येत्या निवडणुकीत त्यांनी भाजप व महायुतीला मतदान करून विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकार यामुळे आजही उत्तरभारतीय समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.नालासोपाऱ्यात कार्यकर्ते नाराज नालासोपारा मतदारसंघात राजन नाईक यांच्या प्रचारासाठी अभिनेते व खासदार रवी किशन हे दाखल होणार होते. तसा त्यांचा दौरा नियोजित करून आराखडा आखला होता. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच भाजप कार्यकर्ते रवी किशन येण्याची वाट बघत ताटकळत होते. मात्र रात्रीचे नऊ वाजून गेले तरीही रवी किशन हे नालासोपारा मतदारसांगता फिरकलेच नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले.
What's Your Reaction?






