ठाण्यातील १७ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

ठाण्यातील १७ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

ठाणे:ठाणे महानगरपालिकेतर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने, महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील एकूण १७ गुणवंत शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात महापालिका शाळांतील १३ तर खाजगी अनुदानित शाळांतील ०४ शिक्षकांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षकांच्या योगदानाचा उल्लेख करून अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुरस्कारप्रात्प शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच, महापालिकेकडून शिक्षण विभागासाठी घेतल्या जात असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.

या सत्कारापूर्वी झालेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी पुढील पिढी सक्षम आणि उत्तम घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा शिक्षकदिनी गौरव करण्याची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच, ‘विज्ञानमंच’अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग हा उत्साह वाढविणारा असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात येत आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सोमण यांनी केले.

शिक्षकांनी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून आजच्या तंत्रयुगातील विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्याची संकल्पना उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार यांनी मांडली आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात प्रत्येक गटातील एक याप्रमाणे आठ शिक्षकांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे - पवार यांनी केले. त्यांनी ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. तसचे, विद्यार्थी विकासासाठी उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमास, ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे पालघर शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष बाबाजी फापाळे, ठाणे पालघर पतपेढीचे जगन्नाथ जाधव आदी उपस्थित होते. शिक्षण विभागाचे अधीक्षक विजय साळवे, गटाधिकारी संगिता बामणे व लेखाधिकारी संदीप कदम तसेच सर्व गटप्रमुख यांच्या नेटक्या नियोजयामुळे हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला. यु आर सी १ व २ चे प्रमुख, समग्र शिक्षाचे प्रकल्प अधिकारी, सर्व सी आर सी केंद्र प्रमुख यांचेही कार्यक्रमास सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे मनपा शाळा क्र. २३चे शिक्षक सुरेश पाटील आणि सी आर सी केंद्र क्र. च्या केंद्र समन्वयक नीलिमा पाटील यांनी नेटकेपणाने केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow