नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांनी विशेष कार्यशाळेत साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

नवी मुंबई:इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांकरीता पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती बनवण्याची कार्यशाळा शाळा क्र.41 अडवली भुतवली, 53 चिंचपाडा, 18 सानपाडा, 20 तुर्भेगाव, 22 तुर्भेस्टोअर, 46 गोठीवली, 33 पावणे, 34 श्रमिकनगर, 35 कोपरखैरणे, 36 कोपरखैरणे गाव, 48 दिवा, 74 कोपरखैरणे व शाळा क्रमांक 2 दिवाळे येथे AWS Incommunities and Learning Links Foundation यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आली.
गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सव हा पवित्र व मंगलमय वातावरणात साजरा होण्यासाठी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पर्यावरणस्नेही दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याची गरज लक्षात घेत हा उपक्रम शाळा स्तरावर घेण्यात आला.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असुन आपले प्रत्येक सण पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करायला हवेत. ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचा प्रभावी प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
उपरोक्त शाळांतील इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थांनी मोठया उत्साहाने यात सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण होते. हे प्रदूषण थांबवणे करिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आली व पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत विद्यार्थ्यांना कृतीतून पर्यावरण मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा वापर करून गणपतीच्या सुबक मूर्ता बनवल्या. पर्यावरण रक्षण करणेबाबत पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती बनवून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा सामाजिक संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
What's Your Reaction?






