नाशकात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी होणार पदाधिकारी मेळावा.

नाशिक, 21 ऑगस्ट (हिं.स.)। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक पदाधिकारी मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.
दि. 23 ऑगस्ट रोजी, सकाळी १० वाजता, तूप साखरे लॉन्स, मुंबई नाका येथे काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारी सदस्य व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज बंटी पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार कुणाल पाटील, प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, आणि प्रदेश एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ नेते काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मेळाव्यानंतर जिल्हा निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीत वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याला नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रवक्त्या हेमलता पाटील, सचिव राहुल दिवे, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, आणि सर्व आघाड्यांचे विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी काँग्रेसच्या जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






