पालघर : पारपत्र काढणार्‍यांचे प्रमाण वाढले; वर्षभरात ८८ हजार जणांनी काढले पारपत्र

२०२१ मध्ये वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे पालघर जिल्ह्याचे स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्यात आले. स्थापनेपासून पारपत्र काढणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे.

पालघर : पारपत्र काढणार्‍यांचे प्रमाण वाढले; वर्षभरात ८८ हजार जणांनी काढले पारपत्र

पालघर - पालघर जिल्ह्यातील पारपत्र कार्यालयात पारपत्र काढणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. चालू वर्षातील ११ महिन्यात ८८ हजार जणांनी पारपत्र काढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण १३ हजारांनी वाढले आहे. २०२१ मध्ये जिल्ह्याच्या स्वतंत्र पारपत्र कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर मागील ३ वर्षात  २ लाख ८ हजार ८६९ जणांनी पारपत्र काढले आहे. 

शिक्षण, व्यवसाय, नोकरी, व्यापारानिमित्त परदेशवारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. परदेश प्रवासासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. पूर्वी पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी साठी वसई आणि पालघरच्या नागरिकांना ठाणे तसेच मालाडला जावे लागायचे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय तसेच वेळेचा अपव्यय व्हायचा. यासाठी पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र पारपत्र कार्यालयाची मागणी करण्यात येत होती. बर्‍याच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ही मागणी मान्य झाली. २०२१ मध्ये वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे पालघर जिल्ह्याचे स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्यात आले. स्थापनेपासून पारपत्र काढणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

२०२१ या पहिल्या वर्षी ४५ हजार ८७४ जणांनी पारपत्र काढले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी सुमारे २९ हजारांची वाढ झाली आणि ७४ हजार ८५७ जणांनी पारपत्र काढले. चालू वर्षात १ जानेवारी ते ३० नोव्हेबर या ११ महिन्यांच्या काळात ८९ जणांनी नवीन पारपत्र काढले आहे. २०२३ च्या तुलनेत पारपत्र काढणाऱ्यांच्या संख्येत १३ हजारांनी वाढ झाली आहे. अद्याप एक महिना बाकी असून त्यात आणखी वाढ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील ३ वर्षांत २ लाख ८ हजार ८६९ जणांनी पारपत्र काढले आहे. 

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. कागदपत्र जमा करण्यासाठी मुलाखतीचा दिवस स्वतःच ठरविता येतो. कागदपत्रांची पूर्तता वेळेवर केली असेल तर पोलिसांकडूनही पडताळणी  (व्हेरिफिकेशन) अगदी चार दिवसांत होते. त्यामुळे पासपोर्टची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. अशी माहिती पारपत्र विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. 


वर्ष       पारपत्र काढणाऱ्यांची संख्या    

२०२१ -  ४५ हजार ८७४
२०२२ -  ७४ हजार ८५७
२०२३ -  ८८ हजार १३८


नवीन पारपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्र  

पारपत्र काढण्यासाठी जन्म, शाळा सोडल्याचा आणि रहिवास दाखला तसेच स्वत:चे ओळखपत्र, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र यासारख्या कागदपत्रांची मूळ प्रत आणि झेरॉक्स प्रत आवश्यक असते. पासपोर्टसाठी अर्ज भरताना १ हजार ५०० रुपये शुल्क भरावे लागते. यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागते. साधारण पासपोर्ट  ४५ दिवसांच्या आत येतो. तत्काळ पासपोर्टकरीता २ हजार ते ४ हजार रुपये खर्च लागतो. तत्काळ पारपत्र ७ दिवसात राहत्या पत्यावर येतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow