पावसाळी वेळापत्रकाचा परिणाम: मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसची फेऱ्यांमध्ये कपात

मुंबई : मुंबई आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय कपात करण्यात आली आहे. १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर लागू करण्यात आलेल्या पावसाळी वेळापत्रकामुळे ही कपात करण्यात आली आहे. दर आठवड्यात सहा वेळा धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता फक्त आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
पावसाळ्यात जोरदार पावसामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा विचार करून गाड्यांचा वेग कमी ठेवावा लागतो. कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवरील दृश्यमानता कमी होते तसेच आपत्कालीन स्थिती ओळखणे कठीण जाते. त्यामुळे, लोको पायलटांना गाडीचा वेग फक्त ४० किमी प्रतितास ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसला मुंबई ते गोवा या सुमारे ५८६ किमी अंतरासाठी आता ८ ते १० तास लागणार आहेत. यामुळे पर्यटक आणि नियमित प्रवाशांना प्रवास नियोजन करताना अडचणी येऊ शकतात.
नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
-
गाडी क्रमांक 22229 (CSMT-मडगाव):
दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, पहाटे ५.२५ वाजता CSMT मुंबईहून सुटेल व दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचेल. -
गाडी क्रमांक 22230 (मडगाव-CSMT):
दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार, दुपारी १२.२० वाजता मडगावहून सुटेल व रात्री १०.२५ वाजता CSMT मुंबईला पोहोचेल.
कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर वाढते. तसेच, पावसाळ्यात मुंबई-गोवा दरम्यानच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक वंदे भारत एक्सप्रेसचा पर्याय निवडतात. मात्र, फेऱ्यांमध्ये झालेल्या कपातीमुळे या प्रवाशांना अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली असून, पावसाळी काळात अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






