बदलापुरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती, ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाचा लैंगिक अत्याचार.

वसई,वसईतील नायगावमध्ये अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेतील ७ वर्षांच्या चिमुकलीवर १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपीला नायगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलगी शाळेच्या दुसऱ्या इयत्तेत शिकते. २२ ऑगस्ट रोजी ती शाळेतील कॅंटीनमध्ये जाण्यास तयार नव्हती आणि कॅंटीनमधील "अंकल" तिला त्रास देत असल्याची तक्रार तिने आपल्या शिक्षिकेला केली. शिक्षिकेने ही माहिती मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांना दिली. सिक्वेरा यांनी मुलीची विचारणा केली असता, मुलीने सांगितले की, मागील १५ दिवसांपासून कॅंटीनमधील १६ वर्षीय तरुण तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. विशेष म्हणजे, मुलीने याबाबत आपल्या घरच्यांना माहिती दिली होती, परंतु त्यांनी तेव्हा गंभीरपणे घेतले नाही.
मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी त्वरीत नायगाव पोलिसांना माहिती दिली आणि आरोपीला पोक्सो कायद्याखाली अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी माहिती दिली की, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले असून इतर मुलींवर असेच प्रकार झाले आहेत का, याचा तपास केला जात आहे. मुलीच्या पालकांनी प्रारंभिक टकरार द्यायला नकार दिला होता, परंतु मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा मुद्दा दडवून न ठेवता पोलिसांना माहिती दिली.
मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी सांगितले की, "आमच्या शाळेत मुलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. शाळेत ६५ ते ७० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हा प्रकार दुर्दैवी आहे, म्हणूनच आम्ही स्वतःहून पोलिसांकडे तक्रार दिली."
What's Your Reaction?






