बदलापूरमधील घटनेनिषेधार्थ शिवसेनेची वसईत आंदोलने!

विरार : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटत असताना याविरोधात वसईतही प्रचंड जनरोष पाहायला मिळाला. या घटनेचा निषेध म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नेतृत्त्वात बुधवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी वसई, नायगाव, भोईदापाडा आणि विरार या शहरभरात जाहीर साखळी आंदोलने करण्यात आली. या प्रकरणातील दोषीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करत शिवसैनिकांनी ‘शिंदे सरकार`विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
आठवड्याभरापूर्वी बदलापूरमध्ये एका शाळेत लहान मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे. पीडित मुलींनी पालकांना माहिती दिली तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली. यानंतर पालकांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला माहिती दिली. त्यांची खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर अत्याचार झाल्याचे उघड झाले. पीडित मुलींचे पालक या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले; त्या वेळी पोलिसांनी त्यांची तातडीने दखल घेतली नाही. सरकारच्या दबावामुळे त्यांना 12 तास तिष्ठत ठेवण्यात आले. शाळा प्रशासनाविरोधातही कठोर पावले उचलली गेली नाहीत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
पोलीस आणि शाळेची ही भूमिका न्याय नाही; किंबहुना आपली मुले-मुली सुरक्षित नाहीत, अशी भावना पालकांची झालेली आहे. त्याहीपेक्षा अशा घटनांत सरकारची स्पष्ट भूमिका नाही. सरकारच्या कचखाऊपणामुळे सातत्याने महाराष्ट्रासह देशभरातून अशा दुर्दैवी घटना समोर येत आहेत. याचा निषेध म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले, अशी माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.
दरम्यान; या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी आग्रही मागणी यानिमित्ताने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. वसई आणि परिसरातही अशाप्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र दबावापोटी पोलिसांनी ही प्रकरणे दाबलेली आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी सरकारचे लक्ष वेधले.
शहरभरात झालेल्या या साखळी आंदोलनांत किरण म्हात्रे, मंगेश चव्हाण, संजय गुरव, स्वप्नील बांदेकर, किशोर पाटील, किरणताई चेंदवणकर, नम्रता वैती, काका मोठे, शरद गावकर, उदय जाधव, गणेश भाईदे, प्रदीप सावंत, प्रवीण म्हाप्रळकर, प्रणव खामकर, विनायक निकम, राजाराम बाबर, युवा सेनेचे भूमिश सावे, भक्ती दांडेकर, प्रतीक जाधव, रोहन पाठारे, पवित्रा चंदा, कृष्णा सावंत, मनोहर पाटील आदी पदाधिकारी-युवा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
What's Your Reaction?






