विरार : नालासोपारा पूर्व येथील मौजे आचोळे येथील ४१ अनधिकृत इमारतींमधील बाधित रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन एक स्वतंत्र धोरण निश्चित करणार असल्याची माहिती आज विधानसभेत मंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन नाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

आमदार राजन नाईक यांनी या इमारतींमधील बाधित रहिवाश्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुनर्वसन करावे या मागणीसाठी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवली येथील अनधिकृत इमारतींबाबत शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचा दाखला देत याच धर्तीवर नालासोपारा येथील बाधित रहिवाश्यांचे पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी शासनाकडे केली. त्याचप्रमाणे आमदार पराग अळवणी यांनी यावर बोलताना सदर आरक्षित जागेचे भुसंपादन करताना जमीन मालकाकडून या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठीचा मोबदला वसूल करण्यात यावा अशीही मागणी केली. नंतर स्वतः तालिका अध्यक्ष श्री.

योगेश सागर यांनी यात हस्तक्षेप करत या विषयाबाबत एक महिन्याच्या आत एक विस्तृत बैठक आयोजित करून तोडगा काढावा असे निर्देश दिले. यावर मंत्री उदय सामंत यांनी बैठक लावण्याचे आश्वासन सभागृहात दिले