महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या चॅलेंजर्स कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे, काजल कुमारी यांची बाजी

पुरुष गटात सागर वाघमारे याने तर महिला गटात काजल कुमारी यांना विजेतेपद मिळाले.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या चॅलेंजर्स कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे, काजल कुमारी यांची बाजी

मुंबई - महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल, बँक ऑफ महाराष्ट्र,ओएनजीसी, बँक ऑफ इंडिया आणि एचपीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पार्क येथील महाराष्ट्र राज्य स्काऊट हॉल येथे ही स्पर्धा पार पडली. 

पुरुष गट  आणि महिला गट अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुष गटात सागर वाघमारे विरुद्ध मोहम्मद घुफ्रान यांच्यात अंतिम सामना तीन सेट पर्यंत रंगला होता.  पहिला सेट सागर ने १९ - ० असा सहज जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. परंतु घुफ्रानने दुसऱ्या सेट मध्ये चांगली कामगिरी करत १४-१३ असा निसटता १ गुणाच्या फरकाने जिंकून सामन्यात रंगत आणल्या. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये पाचव्या बोर्डनंतर घुफ्रानकडे १४-१३ अशी १ गुणाची आघाडी होती. मात्र अंतिम ब्रेक करण्याची संधी सागराकडे असल्याने त्याने त्याचा फायदा उठवत तिसरा सेट १९-२४ असा जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावत १ लाख ५० हजारांची कमाई करत चॅलेंजर्स चषकावर आपले नाव कोरले. 

महिलांच्या अंतिम सामन्यात  काजल कुमारीने नीलम घोडकेवर विजय मिळवला.  नीलम ने पहिला सेट १८-७  असा जिंकून सुरुवात केली.  परंतु काजलने पुढील दोन सेट १४-९, २५-७ असे सहज जिंकत स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. या गटाचे विजेतेपद पटकावत १ लाखाचे बक्षीस मिळवत  चॅलेंजर्स चषकावर आपले नाव कोरले. 

पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत गतवर्षीच्या विजेता झैन अहमदने महाराष्ट्राच्या रहीम खानवर १७-११, २५-१३  असा विजय मिळवला तर महिला गटात तिसरे बक्षीस मिळवणाऱ्या श्रीलंकेच्या हिरुशी मालशानीने महाराष्ट्राच्या आकांक्षा कदम वर तीन सेटमध्ये ०-२५, १६-११,२२-२ अशी मात केली. 

विजेत्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चॅलेंजर्स चषक देऊन गौरविण्यात आले.  याप्रसंगी महाराष्ट्र करम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, मानसचिव अरुण केदार, श्रीलंका कॅरम फेडरेशन से महासचिव लँगली मथायाज, यूएसए कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष अतुल भावे,  मालदीवज्  कॅरम फेडरेशनचे महासचिव रौशन अहमद, सिस्का कंपनीचे अतुल मेहरा, स्पर्धेचे तांत्रिक संचालक महेश सेखरी आदी मान्यवर उपस्थित होते.  स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रसन्न संत यांनी करत स्पर्धंची रंगत वाढविली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow