महिला डब्यात मद्यधुंद पोलिस शिपायाचे अश्लील वर्तन; वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीसच महिलांच्या सुरक्षेला धोका, महिलांमध्ये भीतीचं वातावरण

वसई, ४ ऑगस्ट : बोरीवली ते विरार लोकल प्रवासादरम्यान महिलांच्या डब्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने मद्याच्या नशेत महिलांशी अश्लील वर्तन केल्याची तक्रार समोर आली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अमो सकपाळ असे या आरोपी पोलीस शिपायाचे नाव असून, रविवारी दुपारी तो मिरारोड स्थानकातून बोरीवली- विरार लोकलमध्ये चढला होता. त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. महिलांच्या डब्यात चढल्यानंतर त्याने महिलांकडे अश्लील नजरेने पाहणे, महिलांना तिकिट विचारणे, व काहींचे मोबाईल फोन हिसकावून घेणे, अशा प्रकारचे वर्तन सुरू केले.
या असभ्य वर्तनाला कंटाळलेल्या महिलांनी त्याला नायगाव स्थानकात जबरदस्तीने उतरवून दिले आणि स्टेशन मास्टरकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर स्टेशन मास्टरने वसई लोहमार्ग पोलिसांना बोलावून घेतले. याप्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारीवरून अमो सकपाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकलमध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यातच जर पोलीस शिपाईच असे गैरवर्तन करत असतील, तर महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल महिला प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने आणि पोलीस विभागाने या प्रकारांवर कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी महिलांमधून जोर धरू लागली आहे.
What's Your Reaction?






