मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित मृत्यू

मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आणले असून, त्यामुळे डासांच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, शहरात डेंग्यूची साथ भयानक स्वरूपात पसरली असून, आतापर्यंत किमान १० जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेले काही आठवडे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात डेंग्यूसारख्या गंभीर आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाल्याने डेंग्यूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. शहरातील विविध खासगी दवाखाने व रुग्णालयांमध्ये ताप, अंगदुखी, डोकेदुखी व त्वचेवर पुरळ यासारख्या लक्षणांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढली असून त्यामध्ये डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
भाईंदर पश्चिमेकडील राम मंदिर परिसर, मीरा रोड येथील पेणकर पाडा आणि उत्तन व चौक परिसरात डेंग्यूच्या साथीचा विशेष प्रभाव जाणवत असून, या भागांमध्ये आतापर्यंत किमान १० जणांचा मृत्यू झाल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यापैकी प्रत्येक परिसरात एक ते दोन मृत्यू झाले आहेत. यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला, तरी शहरात डेंग्यूची लागण झालेले अनेक रुग्ण असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यूची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, स्नायूंमध्ये दुखणे आणि त्वचेवर पुरळ होणे ही आहेत. ही लक्षणे संसर्गानंतर चार ते दहा दिवसांनी दिसतात आणि दोन ते सात दिवस टिकू शकतात. त्यामुळे तापासारखी लक्षणे दिसू लागताच नागरिकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गेल्या एका महिन्यापासून शहरात विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. सध्या ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असून, रुग्ण आढळत असलेल्या परिसरांमध्ये नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले जात आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साचू देऊ नये, भंगार वस्तू वेळोवेळी साफ कराव्यात आणि स्वच्छता राखावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
What's Your Reaction?






