मिरा-भाईंदर, १६ जून: मेट्रो कारशेडसाठी १२,४०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला जोरदार विरोध करत आज दुपारी मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना २१,००० पेक्षा अधिक नागरिकांच्या सह्या आणि विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी संघटना व मान्यवरांचे संयुक्त निवेदन देण्यात आले.

हे निवेदन देताना पर्यावरणस्नेही विकासाची मागणी करत "निसर्ग वाचवा – पर्यावरण वाचवा" असा आवाज बुलंद करण्यात आला.

निवेदनात पुढील प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत:

  • १२,४०० झाडांची कत्तल थांबवावी, डोंगर आणि नैसर्गिक परिसराचा नाश टाळावा.

  • पर्यायी मोकळ्या जागा शहरात भरपूर आहेत, तिथे मेट्रो कारशेडचा प्रस्ताव हलवावा.

  • नागरिकांचा मुख्य ऑक्सिजन स्त्रोत – डोंगर व वनक्षेत्र अबाधित ठेवावा.

  • वन्य प्राणी व पक्ष्यांचे संवर्धन व्हावे, त्यांचे निवासस्थान राखले जावे.

  • ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर झाडे तोडणे ही घातक कृती ठरेल.

  • झाडांमुळे तापमान वायुवीजन नियंत्रणात राहते, त्यामुळे त्यांचे संवर्धन अत्यावश्यक आहे.

या आंदोलनात स्थानिक रहिवासी, पर्यावरण कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, अभिनेते, लेखक आणि सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाले. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, “विकास हवाच, पण निसर्गाची किंमत देऊन नव्हे.”

आयुक्तांनी हे निवेदन स्वीकारत नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.