वसई - वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे (दक्षिण) उपायुक्त तसेच सीयुसी विभागाचे प्रमुख अजित मुठे यांची पालिकेच्या परिमंडळ क्रमांक 6 मध्ये बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नव्या दमाचे उपायुक्त दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अनधिकृत बांधकाम -अतिक्रमण निर्मृलन व निष्कासन कामकाज, फेरीवाला धोरण अंमलबजावणी तथा नियंत्रण अधिकारी दक्षिण विभाग, यात प्रभाग डी, जी, एच व आय या विभागांची धुरा त्यांच्याकडे असणार आहे. शिवाय विशेष नियोजन प्राधिकरण, धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही (प्रभागामशी संबंधित), दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही (प्रभागांशी संबंधित), प्रभागातील नालेसफाईवर पर्यवेक्षण तसेच पावसाळी कामावरील पर्यवेक्षण आदी कामांचा भार त्यांच्यावर असणार आहे. तसेच त्यांच्याकडे प्रभाग समिती ब विभागाचा अतिरीक्त कार्यभार असणार आहे.
दरम्यान, महापालिकेचे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. उपायुक्तांच्या बदल्यांसह सहाय्यक आयुक्तांच्यादेखील बदल्या झाल्या आहेत. यात परिविक्षाधीन सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्याकडे प्रभाग समिती ए विभागाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर समाज कल्याण व सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय शिंदे यांना कर आकारणी व कर संकलन विभाग (मुख्यालय) येथे बदली देण्यात आली आहे. तसेच परिविक्षाधीन सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे यांना प्रभाग समिती ई विभागात नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग ब समितीच्या सहा.आयुक्त निलाक्षी पाटील यांना प्रभाग समिती एफ विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.
उपायुक्त अजित मुठे यांना परिमंडळ क्र.6 या विभागात नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे जाहिरात कर, पर्यावरण व प्रदुषण, पाणथळ व कांदळवन संवर्धन, प्रधानमंत्री आवास योजना तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आदी कामे सोपवण्यात आली आहेत. बोळिंज विभागाचे सहा.आयुक्त शशिकांत पाटील यांच्याकडे प्रभाग समिती ब विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रभाग समिती ई च्या सहा.आयुक्त सौंदर्या संख्ये यांच्याकडे समाजकल्याण व सामाजिक न्याय विभागाची सहा.आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पेल्हार विभागाचे सहा.आयुक्त गिल्सन घोन्सालवीस यांच्याकडे क्रिडा विभाग (मुख्यालय) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.