वसई नवघर औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट; पाच जणांची सुखरूप सुटका, एक जखमी
वसई, १९ जून: वसई पूर्वेतील नवघर औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरातील गाळे आणि साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना मनीष इंडस्ट्री क्रमांक १ मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या गाळा क्रमांक ११४ मध्ये घडली. एका सिलेंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण गाळ्याचे छप्पर, सज्जे आणि मलबा उडून समोरच्या मनीष इस्टेट २ इमारतीवर जाऊन आदळले. स्फोटाची तीव्रता इतकी अधिक होती की शेजारील ११३ नंबर गाळ्यासह अन्य गाळ्यांचेही मोठे नुकसान झाले.
स्थानिकांनी तात्काळ वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि गाळ्यात अडकलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका केली. या स्फोटात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.
शिवसेना शाखा प्रमुख गणेश पाटकर आणि परिसरातील गाळा धारकांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
या स्फोटामुळे संबंधित इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून, सज्जे, स्लॅब आणि भिंती कमकुवत झाल्याने इमारत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या इमारतीमध्ये प्रवेश करणे अत्यंत धोकादायक असल्याचे माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी सांगितले आहे.
सध्या घटनास्थळी सुरक्षिततेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासन पुढील कारवाईसाठी तपास करत आहे.
What's Your Reaction?






