वसई-विरार महापालिकेच्या वतीने 'जागतिक बेघर दिवस' साजरा

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत, गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४ रोजी वालीव, वसई (पूर्व) येथील वालीव बेघर निवारा केंद्रामध्ये माननीय आयुक्त अनिलकुमार पवार ( भा.प्र.से.), माननीय अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 'जागतिक बेघर दिवस' साजरा करण्यात आला.
सदर दिनानिमित्त निवाऱ्यामध्ये लाभार्थ्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर Hb, CBC, HIV रक्त तपासणीसुद्धा करण्यात आली.
बेघर लाभार्थ्यांच्या सहभागाने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
सदर साप्ताहिक उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना बेघर व्यक्तींविषयी जाणीवजागृती व जिव्हाळा निर्माण व्हावा, ह्या उद्देशाने निबंध व चित्रकला स्पर्धा या आठवड्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले.
तसेच लाभार्थ्यांच्या पुनर्वसन व रोजगार उपलब्धी करिता उपजीविका केंद्राचे उद्घाटन माननीय उपायुक्त सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदर केंद्राच्या माध्यमातून देणगी मधून प्राप्त जुन्या कपड्यांपासून गोधडी, पाय पुसणी, कापडी पिशवी शिवणकला याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. बेघर निवारा स्वच्छता व सजावट करण्यास लाभार्थ्यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमामध्ये DAY-NULM मा. नियत्रंक सुखदेव दरवेशी, शहर अभियान व्यवस्थापक रुपाली कदम, डॉ. राणी बदलानी, डॉ. दुधमल व वैद्यकीय टीम, प्रभाग समिती 'जी'चे अधीक्षक राजेंद्र कदम व कर्मचारी, समूदाय संघटीका रेणुका, युवा प्रशिक्षणार्थी यांची टीम, तसेच बचत गटातील महिला, सर्व बेघर लाभार्थी बोधी संस्था यांचे उत्स्फूर्तपणे सहभाग व सहकार्य लाभले.
What's Your Reaction?






