वसई-विरार महापालिकेच्या सर डी.एम.पेटीट रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न
वसई, दि. १६ जून २०२५ – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सर डी.एम.पेटीट रुग्णालयाच्या नव्याने बांधलेल्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे सोमवार, दि. १६ जून २०२५ रोजी संपन्न झाले. ही इमारत रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आली असून वैद्यकीय सेवा अधिक व्यापक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने तिचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन विस्तारित इमारतीत नागरिकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये २५ बेडचे प्रसुतीपूर्व विभाग (ANC), २५ बेडचे प्रसुती पश्चात विभाग (PNC), १५ बेडचे नवजात अतिदक्षता विभाग (NICU), ५ बेडचे बालरोग विभाग, गरोदर महिलांसाठी ANC OPD, बालरोग तपासणी, शस्त्रक्रिया विभाग, नवजात बालक लसीकरण विभाग, औषध वितरण विभाग (फार्मसी), सोनोग्राफी विभाग आणि जन्म दाखल्याचे नोंदणीकरण विभाग आदींचा समावेश आहे.
सर डी.एम.पेटीट रुग्णालय हे वसईतील एक जुने आणि विश्वसनीय रुग्णालय असून दरमहा ८ हजार ते १० हजार नागरिक येथे जनरल ओपीडीमध्ये उपचार घेतात. तसेच सरासरी ५०० ते ५५० रुग्ण आंतररुग्ण विभागात दाखल होतात, ज्यामध्ये दरमहा २५० ते ३०० प्रसूती व १०० ते १५० शस्त्रक्रिया केल्या जातात.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या रुग्णालयाच्या मागील बाजूस नवीन इमारत बांधण्यात आली. नवीन इमारतीमुळे अधिकाधिक रुग्णांना सुविधा पुरविणे शक्य होणार असून, ही वैद्यकीय सेवा वसईतील जनतेसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.
या लोकार्पणानंतर वसईतील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी रुग्णालयाच्या विकासाचे कौतुक करत वसई-विरार महापालिकेच्या या पुढाकाराचे अभिनंदन केले.
What's Your Reaction?






