वसई-विरार शहरात ६१ अतिधोकादायक इमारती; महापालिकेने कारवाईला सुरुवात

What's Your Reaction?







वसई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात महापालिकेने ६१ इमारती ‘अतिधोकादायक’ तर ५८ इमारती ‘धोकादायक’ असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर स्थलांतराचे संकट ओढवले आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, एकूण ७०६ इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातील ६१ इमारती अतिधोकादायक असून तात्काळ रिकामी करणे आवश्यक आहे. तसेच, ५८ इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे. याशिवाय ४१५ इमारतींना दुरुस्तीबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात वाऱ्याचा जोर, मुसळधार पावसामुळे जीर्ण व तडे गेलेल्या इमारतींना अधिक धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत नागरिकांच्या जिवित आणि मालमत्तेवर संकट निर्माण होते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने ही पाऊल उचलली आहे.
महापालिकेचे उपायुक्त दीपक सावंत यांनी सांगितले की, "धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही."
महापालिकेने धोकादायक इमारतींचे वर्गीकरण चार श्रेणीत केले आहे:
सी-1: अतिधोकादायक, राहण्यास पूर्णतः अयोग्य – तात्काळ रिकामी करणे आवश्यक.
सी-2A: इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे.
सी-2B: इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती शक्य.
सी-3: किरकोळ दुरुस्ती आवश्यक.
महापालिकेने धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सतर्क राहण्याचे व तात्काळ स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन सज्ज असून, संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांत इमारती कोसळण्याच्या घटनांनी चिंता वाढवली असून, यंदा महापालिकेचा अधिक काटेकोर आणि सक्रिय दृष्टिकोन दिसून येत आहे.