दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्हणून सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेले बेकायदेशीर बांधकाम न तोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

विरारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता आणि ९ जण जखमी झाले होते. त्यानंतर महापालिकेने ८ सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणावर तोडक कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी १० विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, प्रत्येक पथकात ५ कर्मचारी आहेत.

गणेश पाटील यांना ९ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी किंवा त्यांच्या पथकाने कोणतीही कारवाई न केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.

तसेच, जुलै २०२३ मध्येही पाटील यांना महापालिकेच्या कर संकलनातील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या पथकावर कर संकलनाची रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत न भरता वैयक्तिक वापरासाठी वापरण्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांना पुन्हा पदावर बहाल करण्यात आले होते, परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, "बेकायदेशीर बांधकामासंदर्भात महापालिका अत्यंत गंभीर आहे. या विशेष पथकांची स्थापना फक्त अशा बांधकामे तोडण्यासाठीच करण्यात आली आहे."

महापालिकेने आतापर्यंत ८६,००० चौरस फूट पेक्षा अधिक बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.