वसई : सामवेदी कुपारी बोलीभाषेतील 'कादोडी" २०२४' या नाताळ विशेषांकाचे प्रकाशन
कादोडी ही वसईतील एक बोलीभाषा असून गेल्या १३ वर्षांपासून या अंकाचे प्रकाशन केले जात आहे.

वसई - वसईतील बोलीभाषेतील 'कादोडी २०२४' नाताळ विशेषांकाचे प्रकाशन काल वसई येथे पार पडले. प्रसिद्ध चित्रकार श्री. पुयल डिमेलो ह्यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. कादोडी ही वसईतील एक बोलीभाषा असून गेल्या १३ वर्षांपासून या अंकाचे प्रकाशन केले जात आहे.
बोलीभाषांनी नटलेला असा प्रदेश म्हणून ओळख असणाऱ्या वसईत विविध बोलीभाषा बोलल्या जातात. या बोलीभाषांपैकीच एक असलेली भाषा म्हणजे 'कादोडी'. उत्तर वसईत राहणाऱ्या सामवेदी कुपारी समाजाची ही बोलीभाषा आहे. या भाषेला स्वतःला गोडवा आहे तसेच या भाषेत अनेक गाणी देखील आहेत. आजही ही भाषा या समाजाने जिवंत ठेवलेली आहे. ही मौखिक भाषा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देदेशाने या अंकाचे प्रकाशन केले जाते.
अशी झाली अंक प्रकाशनाची सुरुवात
आपल्या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने एका समाज माध्यमावर भेटलेल्या काही साहित्यप्रेमींनी “कुपारी कट्टा” या नावाने सुरू केलेल्या उपक्रमाद्वारे अंक प्रकाशाची संकल्पना पुढे आली. कादोडी भाषेला व्याकरण नसल्याने अंक संपादित करताना थोडी अधिक मेहेनत घ्यावी लागते मात्र, असे असले तरीही गेले १३ वर्षे सातत्याने हा अंक प्रकाशित केला जातो. "बोलीभाषेचा मौखिक स्वरुपात असलेला साहित्याचा खजिना कुपारी समाजाच्या तळागाळात नेता यावा तसेच तरुण वर्गात आपल्या भाषेत नवीन लिहिण्याची आवड निर्माण व्हावी आणि यादृष्टीने प्रयत्न व्हावेत म्हणून “कादोडी” अंक सदैव प्रयत्नशील आहे" असे मत अंकाचे संपादक ख्रिस्तोफर रिबेलो यांनी मांडले.
पुस्तक प्रकशित करत असताना पुयल डिमेलो यांनी देखील अंकाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले," तुम्ही आपल्या संस्कृती आणि बोलीभाषेच्या संवर्धनासाठी खूप चांगले काम करत आहात, ह्या अंकाचे नियमित प्रकाशन करत आपली बोलीभाषा टिकवून ठेवा." तसेच मुखपृष्ठासाठी आपण सैदव मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी संपादक मंडळाला यावेळी दिले.
What's Your Reaction?






