वाहनचोरीप्रकरणी सराईत आरोपी अटकेत; ७ रिक्षा, १ दुचाकी व मोबाईल हस्तगत, ८ गुन्ह्यांची उकल

नालासोपारा : नालासोपाऱ्यात वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला आचोळे पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची ७ रिक्षा, १ दुचाकी आणि १ मोबाईल असा एकूण ₹५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, या कारवाईत ८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी दिली.
आरोपीने धर्में कनोजिया (३४, रा. इंपुरम रेसॉर्ट अपार्टमेंट, एरशाईन सिटी) यांची रिक्षा ३० मे रोजी विनाडायनास्टी सोसायटीजवळून चोरी केली होती. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी ४ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. रिक्षा चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यांचा तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते.
५ जून रोजी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी नालासोपारा पूर्वेकडील फायर ब्रिगेड नाका येथे गस्त घालत असताना, एक संशयित चोरीची रिक्षा चालवत जाताना दिसला. पोलिसांनी पाठलाग करून शशिकांत कामनोर (२४) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पुढील तपासात त्याच्याकडून चोरीच्या ७ रिक्षा, १ दुचाकी आणि १ मोबाईल असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीवर यापूर्वीही ७ गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, सपोनि यशपाल सुर्यवंशी, पोउनि मंगेश वडणे, सफौ दत्तात्रय दाईंगडे, पोहवा शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर, गोविंद गट्टे आणि अमोल बर्डे यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?






