शासकीय दस्तऐवजात बेकायदेशीर फेरबदल भोवले:आगाशी मंडळ अधिकाऱ्याची बदली

शासकीय दस्तऐवजात बेकायदेशीर फेरबदल भोवले:आगाशी मंडळ अधिकाऱ्याची बदली

वसई:वसईतील आगाशी मंडळ अधिकाऱ्याने शासकीय दस्ताऐवजात बेकायदेशीर फेरबदल केल्या प्रकरणी सदर मंडळ अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. साबळे यांनी केलेल्या बेकायदेशीर प्रक्रिये विरोधात स्वराज्य राज्यव्यापी कामगार संघटनेने स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. साबळे यांच्यावर प्राथमिक कारवाईचा एक भाग म्हणून त्यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे करण्यात आल्याची माहिती वसई तहसिलदार कार्यालयाने दिली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. साबळे यांच्या रिक्त जागेवर मंडळ अधिकारी साधना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

सदर प्रकरणात आगाशी येथील मंडळ अधिकारी मणिलाल साबळे, खाजगी लिपिक महेश नाईक यांनी संगनमताने सर्वे क्रमांक १८१ या जमीन मिळकतीचे सातबारे परस्पर बदलून गैर कृत्य केल्याचे उघडकीस आले. याबाबत दिनांक ४ जुलै २०२४ रोजी लेखी हरकती घेण्यात आल्या होत्या. पदाचा गैरवापर करून शासकीय दस्ताऐवज बेकायदेशीररित्या बनवल्या प्रकरणी जिल्हाधिकारी, पालघर यांना तक्रारी देण्यात आल्या होत्या. 

सदर प्रकरणाचे तक्रार रजिस्टर तहसीलदार, वसई यांना हेतू पुरस्सर देण्यात आलेले नव्हते.  त्यामुळे या गंभीर प्रकरणाची चौकशी होऊ शकली नाही. साबळे यांची पूर्व पार्श्वभूमी पाहता त्यांना मंडळ अधिकारी हे पद देणे गैर कायदेशीर असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. असे असतानाही आगाशी कार्यालयामध्ये शेतकरी व भूमिपुत्रांच्या जमिनीच्या नोंदी, सातबारा व फेरफार दुरुस्ती याबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी दाखल आहेत. 

कारवाईचा भाग म्हणून मंडळ अधिकारी साबळे यांची बदली झालेली असली तरी, त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगाशी कार्यालयामध्ये बेकायदेशीर चार खाजगी इसम शासकीय दस्तऐवज हाताळत आहेत. भ्रष्टाचाराचे मुख्य माध्यम त्यांच्याकडून सुरू होत असल्यामुळे यावर तहसीलदार, वसई कारवाई करून निर्बंध आणणार का? हा खरा प्रश्न आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow